Baramati Accident News: बारामतीत भरधाव एसटीच्या धडकेत एका ज्येष्ठ पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबत असलेली त्यांची नात ही गंभीर जखमी झाली आहे.
बसची दुचाकीला जोरदार धडक, आजोबांचा मृत्यू
आज सकाळी बारामती निरा रस्त्यावर शारदानगर येथे हा दुर्देवी अपघात घडला. बारामती आगाराची राज्य परिवहन महामंडळाची बस दुचाकीला धडकल्याने सकाळी पावणे सात वाजता झालेल्या या अपघातामध्ये फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र दिनकर भागवत (वय 59 वर्ष रा. गोखळी ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्या दुचाकीवर असलेली अनेक खेळांमध्ये विक्रम केलेली त्यांची नात स्वरा भागवत ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बारामतीत उपचार सुरू आहेत.
डोन्ट हेट मी प्लीज… पती आणि लेकासह जीव देणाऱ्या शिवांगीचे काळीज धस्स करणारे अखेरचे शब्द
वळणावर भरधाव एसटीची दुचाकीला जोरदार धडक
याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास बारामती निरा रस्त्यावर शारदानगरमध्ये हा अपघात झाल्याची माहिती आहे. येथे बारामतीकडून निरेकडे एसटी बस निघाली होती. त्याचवेळी आपल्या नातीला शारदानगर येथे सोडण्यासाठी राजेंद्र भागवत हे स्वराला घेऊन दुचाकीवरुन जात होते. त्यांची दुचाकी माळेगावकडून शारदानगरकडे वळत असताना समोरून आलेल्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला.
डोक्याला गंभीर जखम, राजेंद्र भागवत यांचा जागीच मृत्यू
यात डोक्याला गंभीर जखम झाल्याने राजेंद्र भागवत यांचा मृत्यू झाला. तर स्वरा ही देखील या घटनेमध्ये जखमी झाली. तिला तातडीने बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हालवण्यात आले आहे. एका महिन्यात सातत्याने वारंवार होत असलेल्या या अपघाताच्या घटनांमुळे बारामतीकर मात्र हादरले आहेत.

