• Thu. Mar 19th, 2026

    देशातील खेळाडू सशक्त बनावा यासाठी सार्वत्रिक काम करू – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 29, 2025
    देशातील खेळाडू सशक्त बनावा यासाठी सार्वत्रिक काम करू – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. २३ (विमाका): देशाला 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनवायचं असेल, तर नागरिकांसोबत खेळाडूही सशक्त झाले पाहिजेत. देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल यासाठी आपण सर्व मिळून काम करू, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

    राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात (एनसीओई) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड, साई केंद्राच्या उपसंचालक मोनिका घुगे, सहायक संचालक सुमेश तरोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    आजपासून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला एनसीओई छत्रपती संभाजीनगर असे नाव मिळाले आहे. “छत्रपती संभाजी महाराजांच्या नावामुळे हे केंद्र खेळाडूंना नवी ऊर्जा देईल,” असे केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी सांगितले.

    हॉकीचे जादूगार महान खेळाडू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यावर्षीपासून देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये तीन दिवस विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    “नव्या क्रीडा धोरणातून खेळाडूंना गुणवत्तापूर्ण सुविधा, आधुनिक प्रशिक्षण आणि प्रोत्साहनपर वातावरण देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजीनगरचे हे केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव करणारे खेळाडू घडवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वोत्तम क्रीडा केंद्रांपैकी असलेले साई केंद्र ‘फिट इंडिया चळवळी’साठीही महत्वाची भूमिका बजावत आहे.”

    प्रस्ताविक उपसंचालक मोनिका घुगे यांनी केले. त्यांनी साई केंद्राच्या कामगिरीची माहिती दिली. या कार्यक्रमास खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed