उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट दिली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी कालच राज ठाकरेंच्या घरी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळे दोन्ही भाऊ राजकारणात एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आज एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिल्यानंतर लगेच त्याचदिवशी दुपारी वेगळ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यानंतर खासदार संजय राऊतांनीदेखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात बाप्पाचं दर्शन घेतल्याची माहिती समोर आली होती. पण उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी बातमी आज समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज ठाकरे यांच्या घरी दाखल होत त्यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं काय आहे? किंवा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असेल? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“राज की बात राजही रहने दो”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर सस्पेन्स वाढवला आहे. “आमच्यात जी चर्चा झाली ती खाजगीच राहु द्या. काही लोकांना आत्ता स्नेहसंबंध आठवले, मात्र आमचा स्नेह आधीपासून”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. “आमच्यात स्नेह असल्याने भोजनही लवकरच होईल”, असंदेखील सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.
राज ठाकरेंच्या पक्षाची बार्गेनिंग पावर वाढली?
आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला उद्धव ठाकरेंनी टफ फाईट दिली होती. याशिवाय विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक आमदार हे मुंबईतून जिंकून आले होते. यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंचं मत आपल्याकडे वळते व्हावेत यासाठी राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचे महायुतीचे प्रयत्न आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडूनही राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामुळे राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची बार्गेनिंग पावर वाढताना दिसत आहे.

