नांदेड – प्रतिनिधी
बँक खाते होल्ड करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार मांडवी बँकेत सुरु असून याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी नांदेडच्या जिल्हा व्यवस्थापकाला पत्र देऊन होल्ड खाते पूर्ववत सुरू करण्याचे व फसवणुकीचे प्रकार तात्काळ थांबविन्याच्या सूचना केल्या आहेत.
मांडवी येथील एसबीआय बँकेत पीककर्ज थकीत असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचे बँक खाते व्यवहार( होल्ड) थांबवून ठेवण्यात आले असून मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने होल्ड केलेले बँक खाते पूर्ववत सुरू करण्यासाठी ठराविक रक्कम तत्काळ भरण्याबद्दल बाहेरील व्यक्तीद्वारे शेतकऱ्यांना कळविले जात आहे.शेतकऱ्यांची दिशाभूल करून ऑनलाइन पैसे भरण्याच्या नावाखाली आर्थिक लुटिचा प्रकार सर्रासपणे सुरू असून माहूर सारखणी भागातील अनेक शेतकरी या ऑनलाइन व्यवहारातील फसवणूकीचे बळी ठरले आहेत.
शेतकरी व मजूरदारासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात.जवळपास सर्वच योजनांचे अनुदान थेटहस्तांतरणाद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. परंतु थकित पिक कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बँकानी शेतकऱ्यांप्रती आडमुठेपणाचे धोरण अवलंबवू नये.पारदर्शक व सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळेल याची दक्षता बँकानी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणावरून शेतकऱ्यांची बँक खाते होल्ड करून व्यवहार थांबविल्यास कठोर कार्यवाही प्रस्तावित केली जाईल.
भीमराव केराम
आमदार किनवट
मांडवी बँकेने शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करून ठेवल्यामुळे शासन योजनेचे अनुदान, पिकविमा, किसान सन्मान निधी,घरकुल अनुदान व इतर शासकीय अनुदान मिळणे बंद झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात मांडवी भागातील शेतकऱ्यांनी आमदार भीमराव केराम यांची भेट घेतली व बँकेतील गैरप्रकार, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची कैफियत मांडून निवेदन सादर केले. या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी तात्काळ नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हा व्यवस्थापकाला पत्र दिले असून मांडवी शाखेतील शेतकरी खातेदारांचे खाते ( होल्ड ) ठेवण्याचा प्रकार गंभीर असून याकडे तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांची बँकखाते पूर्ववत सुरू करण्याची कार्यवाही करावी व शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
