Vidarbha Flood News: विदर्भात जोरदार पावसामुळे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. चंद्रपूरमध्येही पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अतिवृष्टीमुळे चिखली तालुक्यातील लाखांवर शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
पुराच्या पाण्यात दोघे वाहून गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळाला. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे. सोमवारी सायंकाळपासून छत्तीसगडसोबतच दक्षिण गडचिरोलीत पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे इंद्रावती नदीला आलेल्या पुराच्या दबावातून पर्लकोटाचा जलस्तर वाढला. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडली. तालुक्यातील शंभरावर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला.
Vidarbh Rain : निसर्गसौंदर्य फुललं, पण धोका कायम! धुवाधार पावसामुळे मकरधोकडा, पारडगाव फुल्ल; अनेक मार्ग प्रभावित
भामरागड बसस्थानकालगत असलेल्या भागात पाणी शिरल्याने अनेक दुकाने आणि घरांमधील साहित्याचे नुकसान झाले. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामूलगौतम, इंद्रावती या तीनही नद्यांना पूर आल्याने दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरची, कुरखेडा, देसाईगंज, अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्यालाही पुराचा फटका बसला आहे.
१२ मार्गावरील वाहतूक ठप्प
नदी, नाल्यांच्या पुरामुळे जिल्ह्यातील १२ मार्ग बंदस्थितीत आहेत. यात आलापल्ली-भामरागड हा महामार्ग, कोठी-भामरागड, अहेरी-वढ़ा या मर्गाचा समावेश आहे. नदी, नाल्याला आलेल्या पुरातून रस्ता पार करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दमदार बरसला
चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक १४८ मिमी पावसाची नोंद झाली. पुरामुळे कोरपना तालुक्यातील भोयगाव-धानोरा, भारोसा-इरई, कोरपना-कोडशी, ब्रह्मपुरी-वडसा, जिबगाव-सिसर्सी मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. या पावसामुळे सावली तालुक्यात चार घरांचे अंशतः नुकसान झाले. १३७८.२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनबाबत अजितदादांनी दिली माहिती
लाखावर शेतकरी रडकुंडीला
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे चिखली तालुक्यातील सुमारे १५० गावांमधील १ लाख २ हजार ८३२ शेतकऱ्यांवर संकटाचे आभाळ कोसळले. ६३ हजार २१४ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडेच मोडले.
