• Wed. Jun 17th, 2026

    रक्षाबंधनादरम्यान प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न -मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 12, 2025
    रक्षाबंधनादरम्यान प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न -मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद




    मुंबई, दि. १२: यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांचे आभार मानत त्यांनी व एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

    मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी ) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये,  रक्षाबंधनादिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये तर सोमवारी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ८ ते ११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.

    एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांचे आभार मानले असून आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.

    ०००

    नीलेश तायडे/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed