उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली त्या परिसरातून जात होती. विशेष म्हणजे शिंदेंचं भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या रॅलीतील डीजे वाजला आणि एकच गोंधळ सुरु झाला. या दरम्यान पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचा दावा करण्यात आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबीन खान, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल असणाऱ्या अकोले तालुक्यात काल शनिवारी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी दोन वेगवेगळे आदिवासी दिन साजरे केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीनंतर त्यांची बाजार तळ या ठिकाणी सभा संपन्न झाली. शिंदेंच्या भाषणावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी डीजे वाजवला आणि एकच खळबळ उडाली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यासपीठावर भाषण सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांची रॅली देखील त्या परिसरातून जात होती. एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना डीजेचा आवाज देखील येत होता. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी भाषणात याचा उल्लेख देखील केला. “आपलाच भाऊ आहे ना”, असा उल्लेख देखील करण्यात आला. मात्र याच दरम्यान भाषण संपल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परतीचा मार्ग तोच असल्याने पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि याच दरम्यान पोलिसांनी आदिवासींवर लाठीचार्ज केल्याचं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
दुसरीकडे आमदार किरण लहामटे यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत हिशोब चुकता करण्याची भाषा केली. मात्र नंतर त्यांनी यूटर्न घेत लाठीचार्ज झाला नसून रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं स्पष्ट केलं. या झटापटीचा मी निषेध व्यक्त करतो. मला सांगितलं असतं तर रस्ता मोकळा करून दिला असता असं वक्तव्य लहामटे यांनी केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील मतभेदाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दौऱ्याला जावून आले. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याची देखील चर्चा होती.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा