Ramdas Kadam Slams Bhaskar Jadhav : शिवसेना नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
इतकंच नाही तर “1995 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगून भास्कर जाधव यांना मी उमेदवारीचं तिकीट दिलं होतं. त्यावेळी रस्त्यावरती आडवा होऊन माझ्या पायावरती डोकं ठेवण्याचं काम भास्कर जाधव यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांची तुलना माझ्याशी करणं हे चूक आहे”, असं रामदास कदम म्हणाले.
भास्कर जाधव यांच्यावर खोचक टीका
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी टीका केली आहे. “भास्कर जाधव याला आम्ही कोकणात गोमू नाव ठेवलं आहे. गोमू म्हणजे कोण तर शिमग्यामध्ये नाचते. त्याला गोमू नाचा असं शिमग्यात म्हणतात. तसं गोमु नाच्या असं नाव भास्कर जाधव यांचं आम्ही ठेवलं आहे”, अशीही टीका त्यांनी केली.
“कोणी किती उपकार केले तरी त्याची जाणीव ठेवायची नाही. अगदी भाजप नेते नारायण राणे, शिवसेनेचे नेते उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि रामदास कदम या सगळ्यांच्या विरोधात भास्कर जाधव. कोकणातला असा एकही नेता नाही की त्याच्यांविषयी हा चांगला बोलतो. कोकणातल्या एकाही नेत्यासोबत त्यांचे पटत नाही”, अशीही टीका त्यांनी केली.
“भास्कर जाधव हा कोकणातला संपलेला विषय आहे. हा माणूस अगदी काठावरती निवडून आला आहे. म्हणजे 2200 मतांनी हा निवडून आला. समोरच्या उमेदवाराला 1110 मते मिळाली असती तर तो समोरचा माणूस निवडून आला असता. फक्त अकराशे मतांनी भास्कर जाधव निवडून आला”, अशा एकेरी शब्दांत रामदास कदम यांनी भास्कर यादव यांच्यावर निशाणा साधला.
“एक म्हण आहे सुंभ जळाले तरी पिळ जात नाही अशी भास्कर जाधव यांची सवय आहे, म्हणून त्याला आम्ही कोकणात गोमू असं नाव ठेवलं आहे. खाल्लेले अन्नाला न जगणारा जिथे खाणार तिथेच, खाल्ल्या घराचे वासे मोजणारी अवलाद म्हणजे भास्कर जाधव असं थोडक्यात वर्णन करता येईल”, अशी जहरी टीका कदम यांनी केली आहे.
रामदास कदम यांनी उडवली खिल्ली
“मागच्या पंधरा दिवसात अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी भास्कर जाधव यांची साथ सोडलेली आहे. खाडीपट्टा विभागातील मुस्लिम समाज आहे. त्या समाजानेही भास्कर यांची साथ सोडली आहे. त्यामुळे भास्कर जाधव आता रत्नागिरीच्या कोकणाच्या राजकारणातून संपलेला विषय आहे”, अशी खिल्ली रामदास कदम यांनी उडवली आहे. “उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निकालातून भास्कर जाधव यांचा कायमचा निकाल लागणार आहे. हे अवघा महाराष्ट्र पाहील”, अशीदेखील टीका रामदास कदम यांनी केली.

