नाशिकमधील वडनेरमध्ये रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी एका हृदयद्रावक घटनेने गावाला शोकसागरात बुडवले. तीन वर्षांच्या आयुषवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. बहिण श्रेयाने भावाच्या पार्थिवावर राखी बांधून त्याला अखेरचा निरोप दिला.
वडनेर परिसरात भगत कुटुंब वास्तव्यास आहे. किरण भगत यांना श्रेया आणि आयुष नावाची दोन मुलं आहेत. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भगत यांच्या घरात बिबट्या शिरला. भगत कुटुंबाचं घर शेताच्या जवळ आहे. शुक्रवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान किरण भगत यांनी आयुषला जेवणासाठी हाक मारली. पण मळ्यात खेळायला गेलेल्या आयुषकडून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आयुषचा शोध सुरु झाला. जवळपास तीन तास ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते.
ग्रामस्थ, वन विभाग, श्वान पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुषचा शोध घेतला. रात्री पावणे बाराच्या सुमारास आयुषचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. रक्तबंबाळ अवस्थेतील आयुषचा मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. आयुषच्या घरी आई, वडील आणि १० वर्षांची बहीण श्रेया आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या रात्री श्रेयानं तिचा भाऊ कायमचा गमावला. भावाचा निष्प्राण देह पाहून श्रेया धाय मोकलून रडली. तिचा आक्रोश पाहून ग्रामस्थ हेलावले.
आयुषचा मृतदेह पाहून श्रेया रात्रभर रडत होती. ताई, तू मला सकाळी राखी बांध. मी तुला गिफ्ट देईन, असं आयुषनं श्रेयाला सांगितलं होतं. आयुषची अखेरची इच्छा श्रेयानं पूर्ण केली. मृत भावाच्या मनगटावर श्रेयानं राखी बांधली. त्यानंतर आयुषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुषच्या हातावर राखी बांधताना श्रेयाच्या अश्रूंचा बांधू फुटला. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. चिमुकल्या श्रेयाला राखी बांधताना पाहून पाहणारा प्रत्येक जण हळहळला.

