Mumbai Woman Cheated on Matrimonial Site : मुंबईकर महिला पती आणि मुलासह वास्तव्यास आहे. तिने विवाह जुळवणाऱ्या एका मॅट्रिमोनियल साइटवर जुलै महिन्यात नोंदणी केली होती.
निखीला (बदललेले नाव) या वकील महिलेने बोरिवली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. ही महिला पती आणि मुलासह वास्तव्यास आहे. तिने विवाह जुळविणाऱ्या एका वेबसाइटवर जुलै महिन्यात नोंदणी केली होती. तिचे प्रोफाइल पाहून मोहित गुप्ता या तरुणाने तिला ‘रिक्वेस्ट’ पाठवली.
निखीला हिने रिक्वेस्ट स्वीकारताच दोघांनी मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण केली. मोहित याने आपण न्यूयॉर्क येथे डॉक्टर असून अमेरिकी सरकारने सध्या गाझा येथे नेमणुक केली असल्याचे सांगितले. मोहित याने मधाळ बोलण्याने निखोला हिला आपलेसे केले. तिने त्याच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
काही दिवसांनी मोहितने तिला एक ईमेल आयडी दिला. यावर त्याच्या सुट्टीसाठी परवानगी मागणारा अर्ज पाठव, असे तिला सांगितले. त्यानुसार तिने अर्ज तयार करून पाठवला. मंजुरी मिळाल्यानंतर गाझा येथे नेमणुकीला असल्याने मला आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळे गाझा ते फिलिपाइन्स ते भारत असा प्रवास करण्यासाठी पैसे पाठव, मुंबईत आल्यावर देतो, असे मोहित याने सांगताच निखीला हिने दोन लाख रुपये पाठविले.
पैसे मिळताच त्याने विमानाचे तिकीट तिच्या मोबाइलवर पाठवले. त्यानंतर या विमानतळावर अडविले आहे, डॉलर खर्च करता येत नाहीत, अशी कारणे सांगून त्याने तिला सहा लाख रुपये पाठविण्यास भाग पाडले. क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी आणखी रक्कम पाठव, अशी मागणी होताच निखिलाने नकार दिला. मात्र त्यानंतर समोरून संपर्क बंद करण्यात आला.

