सायबर रॅकेटचा पर्दाफाश रायगड पोलिसांकडून करण्यात आला आहे. या गृन्ह्याच्या तपासात 66 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने ५ मे रोजी वयोवृद्ध तक्रारदारास मोबाइलवरून संपर्क साधला आणि टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया मधून बोलतोय असे सांगून ९ नंबर डायल करायला लावला. त्यानंतर तुमचा कॉल मुंबई सायबर पोलीस स्टेशन येथे फॉवर्ड करतो असे सांगून त्यानंतर सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून व्हीडीओ कॉल केला आणि मनी लॉन्डरींग केली असल्याचे धमकावले. तसेच वृद्ध तक्रारदारास त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि सुप्रीम कोर्टाचे अटक वॉरंट निघाले आहे असे सांगितले. यामधून सुटायचे असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील असे सांगून १३ मे रोजी पुन्हा व्हीडीओ कॉल करून रक्कम ३२ लाख तसेच २० मे रोजी व्हीडीओ कॉल करून ३४ लाख रुपये वेगवेगळ्या बँकेत भरायला लावले आणि तक्रारदार यांची ६६ लाखाची फसवणूक केली.
अनेक देशांतील लोकांच्या संपर्कात
याबाबत त्या वृद्ध तक्रारदाराने २३ मे रोजी रायगड येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासामध्ये पोलिसांनी अब्दुस सलाम बारभुयन (आसाम),बिलाल फैजान अहमद, नदिम महम्मद असल्म अहमद ( लखनौ), लारैब मोहम्मद, शादान, रेयाज अहमद खान, अभय संत प्रकाश मिश्रा (उत्तर प्रदेश) बलमोरी विनयकुमार, गंगाधर गंगाराम मुट्टन (हैद्राबाद ), मोहसीन मियां खान (दिल्ली), शम्स ताहिर खान(राजस्थान) यांना अटक केली. यापैकी अभय संत मिश्रा हा आरोपी पाकिस्तान, कॅनाडा, नेपाळ, बांगलादेश या देशातील लोकांचे सपर्कांत असल्याचे दिसुन आले आहे. सदर आरोपी हा नेपाळ येथे कायमस्वरूपी वास्तव्याकरीता बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या तयारीत होता.

