• Thu. Jun 25th, 2026

    अखेरचा प्रवासही मृत्युच्या कुशीत अडकला; नागपुरात शव घेऊन जाताना रुग्णवाहिकेला अपघात, दोघांचा मृत्यू, लेक…

    अखेरचा प्रवासही मृत्युच्या कुशीत अडकला; नागपुरात शव घेऊन जाताना रुग्णवाहिकेला अपघात, दोघांचा मृत्यू, लेक…

    Nagpur Accident : काही घटना या सुन्न करणाऱ्या असतात. नागपुरात घडलेली ही घटना देखील तशीच आहे. 65 वर्षीय कन्हाई बिस्वास यांचं पुण्यात निधन झालं होतं. त्यांचे कुटुंबिय आणि इतर नातेवाईक गावी असल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून कोलकात्याकडे नेलं जात होतं. पण नागपुरात अतिशय वेदनादायी घटना घडली. कन्हाई यांचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाने इतक्या जोरात धडक दिली की, यामुळे रुग्णवाहिका चालक आणि मृतकाचा नातेवाईकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृतक बिस्वास यांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. पण या घटनेमुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जितेंद्र खापरे, नागपूर : मृत व्यक्तीचा अंत्ययात्रेचा प्रवासही मृत्यूच्या कुशीत अडकला. पुण्यात मृत्यू झालेल्या कन्हाई बिस्वास यांचा मृतदेह रुग्णवाहिकेकडून कोलकात्याकडे नेत असताना नागपूर-जबलपूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला. भारत पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत रुग्णवाहिका चालक आणि मृतकाचा नातेवाईकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हाई बिस्वास (वय 65, रा. कोलकाता) यांचे पुण्यात निधन झाले होते. त्यांच्या मृतदेहासोबत त्यांचा मुलगा अबीर बिस्वास (वय 30) आणि त्यांचा नातेवाईक पंकज बिस्वास (वय 40) हे दोघे रुग्णवाहिकेने कोलकात्याकडे निघाले होते. रुग्णवाहिकेचे चालक शिवाजी खल्लू भांबुरे (वय 45, रा. पुणे) होते.

    प्रवासादरम्यान नागपूरजवळील भारत पेट्रोल पंपाजवळ रुग्णवाहिकेमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे मृतकाचा मुलगा अबीर बिस्वास रस्ता ओलांडून मेकॅनिक शोधण्यासाठी गेले होते. दरम्यान, एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की अ‍ॅम्ब्युलन्स रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 25 फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली.

    या अपघातात रुग्णवाहिकेत असलेले पंकज बिस्वास आणि चालक शिवाजी भांबुरे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. यावेळी अबीर बिस्वास हे मेकॅनिक शोधण्यासाठी बाहेर गेल्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला, मात्र या दुर्दैवी घटनेमुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

    घटनेनंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दोषी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे. ही घटना मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेच्याच प्रवासात नवा मृत्यू घडवणारी ठरली आहे. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा