• Wed. Mar 11th, 2026

    ‘हे अतिशय चुकीचं, भूषणावह नाही’, माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्र्यांचा दणका, भर माध्यमांसमोर मांडली नाराजी

    ‘हे अतिशय चुकीचं, भूषणावह नाही’, माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्र्यांचा दणका, भर माध्यमांसमोर मांडली नाराजी

    Devendra Fadnavis on Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनातील रम्मी खेळतानाचा कथित व्हिडीओ समोर आल्याने ते अडचणीत आले आहेत. या व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकार हा अतिशय चुकीचा आणि भूषणावह नाही, असं देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद आता संकटात सापडलं आहे. माणिकराव कोकाटे यांचे याआधी शेतकऱ्यांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहेत. त्या वक्तव्यांवरुन राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ याआधीच झाला आहे. यानंतर माणिकराव कोकाटे यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे पावसाळी अधिवेशनात थेट विधीमंडळाच्या सभागृहात बसून मोबाईलमध्ये जंगली रम्मी खेळत असल्याचं दिसत आहे. या घटनेवर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण रम्मी खेळत नसून जाहिरात स्किप करत होतो, असं कोकाटे म्हणाले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं टेन्शन वाढलं आहे.

    मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

    “मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. अशाप्रकारे विधान भवनात ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरी तिथे सिरिअस बसणं गरजेचं आहे. साधारणपणे एखाद्यावेळेस असं होतं की, तुम्ही काही कागदपत्रे वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडीओ हा निश्चितच योग्य नाही. आता त्यांनी खुलासा दिला आहे. मी रमी खेळत नव्हतो. अचानक ती पॉप अप झाली. जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलं आहे ते भूषणावह नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    मंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा देणार?

    माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडीओवर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता माणिकराव कोकाटे आता मंत्रिपदाचा राजीनामा देतात का? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. या सस्पेन्सवरुन आता लवकरच पडदा उठण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा