• Tue. Mar 10th, 2026

    लातूरमध्ये तुफान राडा, सुनील तटकरेंसमोर पत्ते फेकले, नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण

    लातूरमध्ये तुफान राडा, सुनील तटकरेंसमोर पत्ते फेकले, नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण

    Latur News : लातूरमध्ये मोठा राडा झाला आहे. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेवेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर पत्ते फेकले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर पत्रकार परिषद संपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    लातूर : लातूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आज लातूरला आले होते. ते पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले. त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहातील कथित रमी खेळण्याच्या व्हिडीओवरुन सुनील तटकरे यांना निवेदन दिले. यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्यासमोर आक्रमक झाले. त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी सुनील तटकरे यांनी विनम्रपणे छावा संघटनेचं निवेदन स्वीकारलं. पण नंतर मोठा राडा झाला. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

    छावा संघटनेने सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण केली. यावेळी राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हेदेखील दिसत आहेत.

    पत्ते फेकताना छावा संघटनेचे कार्यकर्ते काय म्हणाले?

    “मी काही तुमच्यासोबत भांडायला आलेलो नाही. पण राज्याच्या कृषीमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. ही आमच्या छावा संघटनेची मागणी आहे. आम्ही आज प्राथमिक स्वरुपामध्ये हे पत्ते आणले आहेत. हे पत्ते तुम्ही कृषीमंत्र्यांना द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. विधानसभेचं सभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातील कष्टकऱ्यांचं आणि कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्याठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. ती पत्ते खेळायची जागा नाही. तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत. तुम्ही त्यांना मंत्री केलं आहे. तुम्ही त्यांना मंत्रिपदावर ठेवू नका. त्या व्यक्तीमुळे तुमच्या पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे”, असं छावा संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले. यावेळी सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांचे निवेदन घेतले. पण पत्रकार परिषदेनंतर मोठा राडा झाला.

    सुनील तटकरे काय म्हणाले?

    दरम्यान, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं. “कृषीमंत्री गंभीर जरुर आहेत. ते गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की तुमच्यासोबत बोलेन. त्यांना कृषीमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपलंच पाहिजे. कुणाच्या मनात संशय असण्याचं कारण नाही. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळेल. एक बाब आहे, आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील आहोत”, असं सुनील तटकरे म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा