मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दुबे तू मुंबईत येऊन दाखव, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, असं राज ठाकरे म्हणाले.
हिंदी भाषा सक्तीवरुन आक्रमक झालेल्या राज ठाकरेंना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आव्हान दिलं होतं. आमच्या भागात येऊन दाखवा. पटक पटक के मारेंगे अशी भाषा दुबे यांनी वापरली होती. त्या आक्षेपार्ह भाषेला राज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. अरे दुबे, हिंमत असेल तर तू मुंबईत येऊन दाखव. समंदर में डुबे डुबे के मारेंगे, असं प्रतिआव्हान राज यांनी दिलं. यानंतर समोरच्या गर्दीतून मराठीचा जयघोष झाला.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकात अशाच स्वरुपाची घटना घडली. तिथल्या स्थानिक व्यक्तीसोबत हिंदी भाषिक व्यक्तीनं हुज्जत घातली. तिथल्या तिथे धडा शिकवण्यात आला. दक्षिण भारतात असे प्रकार तिथले सत्ताधीश खपवून घेत नाहीत. केंद्रात कोण आहेत, कोणाचं सरकार आहे, याची फिकीर ते करत नाहीत. आपल्या भाषेबद्दल आपण इतकं कडवट असायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.
माझा हिंदी भाषेला विरोध नाही. सक्तीला विरोध आहे. हिंदुत्त्वाच्या बुराख्याच्या आडून जर का तुम्ही हिंदी लादून मराठी संपवणार असाल तर खबरदार, असा इशारा राज यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. आम्ही हिंदू आहोत. पण हिंदी नाहीत, ही गोष्ट सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी इतका का भांडतोय, असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. हे सगळं कोणाच्या इशाऱ्यावर सुरु आहे, असा सवाल त्यांनी केला. हिंदी सक्तीच्या आडून मोठं षडयंत्र सुरु आहे. त्यामुळे जागरुक राहा, असं आवाहन राज यांनी केलं.

