Raigad Fort : रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पावसाळ्यामुळे हा निर्णय घेतला. महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी पायरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. पर्यटकांना रोपवे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण रोपवेच्या दरांवरून पर्यटकांमध्ये नाराजी आहे.
यासंदर्भात महाड उपविभागीय अधिकारी उमासे यांच्या २० जूनच्या अहवालानुसार आगामी पावसाळ्यामध्ये किल्ले रायगडावर जाणाऱ्या पाऊलवाटांवर पावसाळ्याच्या काळात वारंवार दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त आणि होऊ नये याकरता किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा आणि पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करण्याबाबत प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी करावी, अशी विनंती उपविभागीय अधिकारी महाड यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती.
या अहवालानुसार पायरी मार्गावर दरड कोसळणे, पाण्याचा प्रवाह वाढल्यास पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून पायरी मार्गावरील किल्ले रायगडावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा असा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला आहे. याची अंमलबजावणी मंगळवार १५ जुलै पासूनच लागू झाली आहे.
जुलै महिन्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने नागरिक आणि पर्यटकांना या मार्गाने जाण्यास प्रतिबंध करावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांनी नाणे दरवाजा, चित्तदरवाजा तसेच किल्ले रायगड येथे पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असे सुचित करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास संबंधित व्यक्ती विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51, 54, 56 अन्वये कारवाई करण्यात येईल असे लेखी आदेशात नमूद करण्यात आले आहे.
रोपवेचे दर आणि पर्यटकांना नाहक भुर्दंड?
किल्ले रायगडावर पावसाळ्यात जाण्यासाठी शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. पण पायरी मार्गावर दरड पडून कोणत्याही प्रकारचे जीवित आथवा वित्त हानी होऊ नये याकरता किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग हा पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा आणि पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्याकरिता रोपवेचा वापर करणेबाबत प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी व्हावी याचा अर्थ ऋतुवेचा गल्ला भरणे हा नाही का? अशी प्रतिक्रिया रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या मार्गावरील अनेक शिवभक्तांनी बोलून दाखवली. आम्ही रायगड किल्ल्यावर येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी येतो. मात्र रायगड रोपवेचे वाढत जाणारे अवाच्या सव्वा दर हे कमी करण्याबाबत रायगडचे लोकप्रतिनिधी मूग गिळून का गप्प बसतात? असा सवाल देखील अनेक पर्यटकांनी संतप्तपणे बोलून दाखवला आहे.

