ससून गोदी (डॉक) येथील मच्छिमार बांधवांसाठी विविध सुविधा उपलब्ध– मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. १४: ससून गोदी (डॉक) येथील मच्छिमार बांधवांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून येथील मच्छिमार बांधवांना कुठेही हलविले जाणार नाही, असे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य राजेश राठोड यांनी ससून डॉक येथील बंजारा मच्छिमार बांधवांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने सदस्य श्रीमती चित्रा वाघ, सदस्य सर्वश्री शिवाजीराव गर्जे, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.
मत्स्य व्यवसाय मंत्री राणे म्हणाले, ससून गोदी (डॉक) आधुनिकीकरणासाठी ९६.९२ कोटी इतक्या रकमेचा सुधारित आराखडा शासनास सादर करण्यात आला आहे. यामध्ये २२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामाध्यमातून मासळी सोलणाऱ्या मुख्यतः महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट प्राधिकरण यांच्यामार्फत विश्रांती घेण्यासाठी व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळामार्फत महिलांच्या व पुरुषांच्या विश्रामगृहामध्ये आराम करण्याकरिता कारपेटची सुविधा, जेवण करण्याकरीता सहा आसनी चार कॅन्टीन टेबल, मच्छिमारांना बसण्याकरीता तीन आसनी सहा खुर्ची तसेच पंखा, लाईट व मोबाईल चार्जिंग करण्याकरीता इलेक्ट्रिक बोर्ड (बॉक्स) आदी सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाने ससून डॉक येथील मासळी विकणाऱ्या/ मासळी साफ करणाऱ्या महिला/पुरुषांच्या प्रसाधनगृहांची सोय करण्याच्या दृष्टिने १० शौचालयांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असल्याची माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली.
मच्छिमार बांधवांच्या रोजगाराला बाधा येणार नाही हे पाहून हाताने मासळी सोलणाऱ्या महिलांसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल का, हे तपासून पाहण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिले. यावर याबाबत अभ्यास सुरू असून लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
पुण्याच्या कुसगाव येथे ५७ टन गोवंशीय मांस सापडल्याप्रकरणी एसआयटी स्थापन करणार – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १४ : पुण्याच्या मौजे कुसगाव येथे २५ मार्च २०२५ रोजी सुमारे ५७००० किलो गोवंशीय मांस दोन मोठ्या कंटेनरमध्ये वाहतूक करताना आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशीय मांस सापडल्याने या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकामार्फत तपास करण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य श्रीकांत भारतीय, ॲड. अनिल परब यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर गृह राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी उत्तर दिले.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, प्राथमिक तपासात एशियन फूड्स मायक्रो प्रा. लि. या कंपनीचा या वाहतुकीत सहभाग असल्याचे उघड झाले आहे. ही कंपनी हैदराबाद येथील असल्याने राज्य शासनाकडून या कंपनीचे अपेडाद्वारे प्राप्त परवाना रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली असल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
या प्रकरणी कंपनीचे दोन मालक आरोपी आहेत. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन जामीन मिळाला आहे. दुसऱ्या आरोपीच्या अटकेसाठी प्रक्रिया सुरू आहे. वारंवार अशा प्रकारच्या गोमांस तस्करी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लावण्याचा विचार करण्यात येत आहे. तिसऱ्यांदा गुन्हा करताना आढळल्यास मकोका अनिवार्यपणे लावण्यात येईल. तसेच आगामी अधिवेशनात गोमांस तस्करी विरोधी स्वतंत्र कायदा आणण्याचाही निर्णय घेण्यात येईल. यासोबतच, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल झाले असतील, तर त्याचा आढावा घेऊन गुन्हे मागे घेण्याच्या दृष्टीनेही विचार केला जाईल, असे गृह राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी स्पष्ट केले.
सन 2022 ते 2025 दरम्यान गोवंशीय प्राण्यांची कत्तल, वाहतूक व विक्री संदर्भात २८४९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४,६७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच १,७२४ टन मांस जप्त करण्यात आले असल्याची माहितीही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी दिली.
०००
संजय ओरके/विसंअ
पुढील अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणणार – गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १४ : राज्यात धर्मांतर विरोधात कायद्याच्या अभ्यासासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातील सूचनांचा विचार करून पुढील अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य उमा खापरे यांनी पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या अनाथ आश्रमात मुली व महिला यांचे धर्मांतरण केले जात असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, डॉ. मनिषा कायंदे, सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला.
याबाबत माहिती देताना राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, केडगाव येथील अनाथ आश्रमामध्ये मुलींचे धर्मांतरण तसेच मुलींना मारहाण करणे, सार्वजनिक शौचालय साफ करायला लावणे, जातीवरून शिवीगाळ करणे, वाईट वागणूक देणे अशा फिर्यादीवरून ८ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या संस्थेतील अनियमितता तसेच सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यासंदर्भात तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू असून एका महिन्यात याचा चौकशी अहवाल प्राप्त होईल, आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/
नॉर्थ कॅनरा गौड स्वारस्वत को – ऑप बँकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसीबी मार्फत चौकशी – गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. १४ : नॉर्थ कॅनरा गौड स्वारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, कर्मचारी आणि यु.बी. इंजिनिअरींगचे मुख्य वित्तीय अधिकारी व इतर संबंधित यांनी आपसात संगनमत करुन सन २०१८ ते २०२१ यादरम्यान बँकेच्या गिरगाव शाखेतील यु.बी. इंजिनिअरींग कंपनीचे अवसायक यांनी बंद केलेले बँक खाते मुख्य वित्तीय अधिकारी यांच्या बनावट पत्राच्या आधारे उघडून व सिग्नेटरी अथॉरिटीमध्ये बदल करुन त्यात आर्थिक व्यवहार केले. याबाबत १.८३ कोटी रुपये इतरत्र वळविली असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या असून या प्रकरणाचा तपास करणारा पोलीस अधिकारी यांचेही बँकेसोबत संबंध असल्याची तक्रार असल्याने या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली, त्यावेळी गृह राज्यमंत्री कदम यांनी माहिती दिली.
या बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावर विधानपरिषदेत स्पष्टीकरण देताना राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले की, संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याविरुद्ध कुठल्याही आर्थिक देवाण-घेवाणीचा लेखी पुरावा चौकशी दरम्यान मिळालेला नाही. तथापि या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीची त्यावेळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी चौकशीस योग्य दिशा दिली नाही. म्हणूनच त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल प्रशासनाने आवश्यक ती कारवाई केली आहे.
बँकेसंदर्भात अधिकची माहिती देताना राज्यमंत्री कदम म्हणाले की, बँकेचे फ्रीज झालेले १.८३ कोटी रुपये अनधिकृतपणे डी-फ्रीज करून काढण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही बाब उघड झाल्यानंतर बँकेने संपूर्ण रक्कम व्याजासहित परत केली. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संबंधित बँकेवर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. या बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि त्यांची पत्नी (बँकेच्या चेअरमन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे ४७ प्रकरणांत फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले असून चौकशी सध्या सुरू आहे.
०००
संजय ओरके/विसंअ/
