Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली, ज्यामुळे तणाव निर्माण झाला. गायकवाड यांनी या हल्ल्यासाठी थेट सरकारला जबाबदार धरले असून, हा त्यांच्या हत्येचा कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे पुरोगामी विचारधारेचे कार्यकर्ते असुरक्षित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तसेच या हल्ल्यामागे षडयंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
‘ही शेवटाची सुरुवात’
“कधीकधी पक्ष फोडले जातात, पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यांच्यासारखी कुठली गोष्ट करता नाही आली, आम्ही एक सत्य विचारसरणीचं काम करतो. आमचा विचार हा राज्यघटनेला अपेक्षित असलेला समता, बंधूता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे. या देशात मानवता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे. पण दुर्दैवाने अशा सामाजिक संघटनांबाबत काही गैरसमज पसरवले जातात. मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.”मी या घटनेचा निषेध करणार नाही. पण एक निश्चित सांगतो, ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. राज्यकर्त्यांमध्ये मुख्यत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. मी कार्यक्रमात पोहोचलो त्यावेळेस कोणत्याही प्रकारची पोलीस यंत्रणा नव्हती”, अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिली.
‘माझ्या हत्येचा कट होता’
“अशावेळेसे मला वाटते की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथे नव्हती का? काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का? माझ्या जीविताला धोका होता का? माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे मी जिवंत आहे. मला आनंद वाटतो की, या पुढच्या काळात काहीतरी चांगलं काम करायचं असल्यामुळे हे नवीन जीवन मिळालं”, असा दावा प्रवीण गायकवाड यांनी केला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं, नेमकं काय घडलं?
“माझ्या हत्येचा कट होता. माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी जिवंत आहे. अन्यथा माझ्यावर हल्ला झाला होता. याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे”, असं प्रवीण गायकवाड स्पष्ट म्हणाले.

