• Fri. Mar 13th, 2026

    ‘एकवेळ जीव देईन, शहीद होईन, पण मराठी बोलणार नाही’, भोजपुरी गायक पवन सिंह यांचं वक्तव्य

    ‘एकवेळ जीव देईन, शहीद होईन, पण मराठी बोलणार नाही’, भोजपुरी गायक पवन सिंह यांचं वक्तव्य

    Bhojpuri Singer Pawan Singh Statement : महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादावर भोजपुरी गायक पवन सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जीव गेला तरी मराठी बोलणार नाही”, असं वक्तव्य पवन सिंह यांनी केलं आहे. आपल्याला मुंबईत काम करण्याचा आणि हिंदी बोलण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच मनसेच्या भूमिकेवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पाटणा : महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी वाद तापलेला असतानाच आता भोजपुरी चित्रपटसृष्टीतील गायक पनव सिंह यांनी ठाकरे बंधूंना चॅलेंज दिलं आहे. “जीव गेला तरी चालेल, शहीद झालो तरी बेहत्तर, पण मराठी बोलणार नाही”, असं पवन सिंह म्हणाले आहेत. पवन सिंह यांनी काराकाटमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. ते सामाजिक आणि राजकीय घटनांवर रोखठोकपणे भूमिका मांडत असतात. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावरुन भूमिका मांडली आहे. “मला मराठी येत नसली, तरी मी मुंबईत काम करतो आणि करत राहणार. भारतात मला हिंदी बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे”, असंदेखील पवन सिंह म्हणाले.

    पवन सिंह यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रातील भाषेच्या वादावर जोरदार टीका केली. “मला मराठी येत नाही. माझा जन्म बंगालमध्ये झाला, मला बंगालीसुद्धा येत नाही. मला बंगाली भाषा शिकता येणार नाही, म्हणून मी बोलत नाही. मला हिंदी बोलण्याचा अधिकार आहे. मी महाराष्ट्रात राहतो, तिथे काम करतो, म्हणून मराठी आलंच पाहिजे, हे काय आहे? ही तर गर्व आणि अहंकारची गोष्ट आहे”, असं पवन सिंह म्हणाले.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला केलेली मारहाण पवन सिंह यांनी चुकीची ठरवली आहे. “मी काम करायला मुंबईला जाणार. हे लोक जास्त काय करणार, मला जीवे मारतील? मला मरणाची भीती नाही. अशा प्रकरणात माणूस मारला गेला, तर शहीद होतो. मराठी येत नाही, बोलत नाही, मग मला मारुन टाकलं तरी चालेल”, असं पवन सिंह म्हणाले. पवन सिंह यांनी यावेळी कुणाही नेत्याचं नाव घेतलं नाही. पण, महाराष्ट्रमध्ये राहणाऱ्या बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील लोकांना त्यांनी धीर दिला आहे. त्यांनी सांगितलं की, “तुम्ही आपलं काम करत राहा, हार मानू नका. सतत मेहनत करत राहा. कोणी काही करू शकत नाही.”

    पवन सिंह यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे MNS मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरत आहे, तर दुसरीकडे पवन सिंह यांनी थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता या वादाला आणखी किती तोंड फुटणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू झाली आहे. काही लोक त्यांच्या समर्थनात आहेत, तर काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, पवन सिंह आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

    पवन सिंह यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक विषयांवर आवाज उठवला आहे. ते नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेलाही गांभीर्याने घेतलं जात आहे. आता या प्रकरणावर राज ठाकरे आणि MNS काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद समोर आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा