• Sat. Mar 14th, 2026
    एटीएम कार्डचा वापर करुन ‘असा’ घातला जातोय गंडा, ‘या’ लोकांपासून सावध राहा

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएम कार्ड बदलून फसवणूक करण्याचे सत्र सुरूच आहे. शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये, अज्ञात व्यक्तींनी नागरिकांना बोलण्यात गुंतवून आणि मदतीचा बहाणा करत त्यांचे एटीएम कार्ड बदलले. यानंतर, त्यांनी एकूण ८३ हजार रुपयांची रक्कम काढली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    छत्रपती संभाजीनगर : एटीएम कार्डची अदलाबदली करुन गंडा घालण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात तीन जणांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून तब्बल ८३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या तीनही घटनेत आरोपींनी एकसारखीच शक्कल वापरत, नागरिकांची दिशाभूल करून त्यांचा एटीएम पिन मिळवला आणि कार्ड बदलून रक्कम लांबवली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    पहिली घटना पडेगाव परिसरात घडली. फिर्यादी मिस्त्रीलाल हरिराम धोटे (वय ६६) हे सेवानिवृत्त आहेत. ते पडेगाव येथील फिरदोस गार्डन परिसरात राहतात. प्रबरी नसल्याने त्यांनी आपले एटीएम कार्ड पुतण्या रोहन याला देऊन रक्कम काढायला पाठवले होते. रोहन हा पडेगाव परिसरातील एका एटीएम सेंटरमध्ये गेला. तेथे आधीपासून एक व्यक्ती उभा होता. त्या व्यक्तीने मदतीच्या बहाण्याने रोहनकडून एटीएम कार्ड घेतले आणि त्याऐवजी दुसरे कार्ड परत दिले.

    रोहन नकळत त्या व्यक्तीने दिलेले चुकीचे कार्ड घेऊन निघून गेला. त्यानंतर आरोपीने कार्ड वापरून फिर्यादीच्या बँक खात्यातून परस्पर ३० हजार काढत फसवणूक केली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दुसरी घटना सिडको परिसरातील आहे. पवन जितेंद्र शेलार वय १९) या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, ४ जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास मुंकुदवाडी परिसरातील सोहम मोटार्सच्या मागे असलेल्या एका एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेला. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याशी संवाद साधला आणि विश्वास संपादन करून एटीएम कार्डचा पिन कोड जाणून घेतला. त्यानंतर हातचलाखीने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलले, आणि त्यानंतर त्याच कार्डाचा वापर करत आरोपीने १३ हजारांची रोख रक्कम काढून घेतली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तिसरी घटना १० जुलै रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मोरे चौक, बजाजनगर येथे घडली. फिर्यादी जयकुमार दत्तराव पाईकराव (वय ३१ रा, दत्तनगर, रांजणगाव) हे मोरे चौकातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. सेंटरवर दोन व्यक्तींनी मदत करण्याचा बहाण्याने फिर्यादीच्या एटीएम कार्डचा पिन बघितला. त्यानंतर हातचलाखीने कार्डची अदलाबदल केली आणि फिर्यादीच्या खात्यातून ४० हजारांची रोकड काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाईकराव यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा