Manmad Crime News : दारू उधार दिली नाही याचा राग मनात धरून बार मालकावर दोन तरुणांनी सुरीने प्राणघातक हल्ला केला. संबंधित घटना ही नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
दारू उधार दिली नाही याचा राग मनात धरून बार मालकावर दोन तरुणांनी सुरीने प्राणघात हल्ला केल्याची धक्कादायक घटना मनमाड शहरात घडली आहे. कुलजीतसिंग कांत असे बारमालकाचे नाव आहे. त्यांनी वेळीच वार चुकविल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र या हल्ल्यात त्यांच्या मानेला जखम झाली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्यापारी महासंघाने या घटनेचा निषेध करून आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे.पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा केला आहे.
पोलिसांनी सांगितला घटनेचा थरार
पोलीस निरीक्षक विजय करे यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. “संबंधित घटना ही काल रात्रीची आहे. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पुणे-इंदूर हायवेवर चोपडा पेट्रोल पंपाच्या समोर हॉटेल पंजाब नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये हॉटेलचे मालक कुलजीत सिंह कांत बसले होते. त्यावेळी दोन्ही आरोपी आले. त्यांनी हॉटेल मालकाकडे मोफात दारु मागितली. हॉटेल मालकाने दारु देण्यास नकार दिला. यामुळे आरोपींनी हॉटेल मालकावर हल्ला केला. यापैकी पहिला वार हॉटेल मालकाने थोपवला. पण हल्लेखोराने पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल मालकाच्या मानेला जखम झाली. या घटनेनंतर तातडीने दोन्ही आरोपींनी 15 मिनिटात पोलिसांनी अटक केली. आरोपींना यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे”, अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिली.
विशेष म्हणजे संबंधित आरोपींनी आठ-नऊ महिन्यांपूर्वी देखील असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी याआधीदेखील मोफत दारु मागितली होती. पण हॉटेल मालकाने दिलं नव्हतं. त्यावेळी आरोपींपैकी एकाने दुकानाबाहेर जाऊन हातात मोठा दगड घेत हॉटेलच्या दिशेला भिरकावला होता. पण त्या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत देण्यात आली नव्हती. यानंतर काल पुन्हा आरोपींनी धिंगाणा घालत हल्ला केला, अशी माहिती माहिती पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिली.

