Maha Vikas Aghadi : महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण विरोधी पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
“स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मतानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातात. हे आजचंच नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अशाप्रकारे निवडणुका लढल्या जात आहेत. त्यामुळे संजय राऊत काय बोलले यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की, स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात आघाडी किती राहील या गोष्टी आजपासून कुणाला सांगता येणार नाहीत. त्यामुळे मी आज त्यावर प्रतिक्रिया देणे बरोबर नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
“सगळ्याच पक्षाने स्वबळाची तयारी केलेली आहे. त्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही. ज्या वेळेस निवडणुका लागतील, स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच ठाकरे बंधू एकत्र आले तर आमचं हायकमांड निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा
दरम्यान, नाना पटोले यांनी आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या एका कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकावर निशाणा साधला. “शिवसेनेच्या आमदाराने कॅन्टीनमध्ये एका कामगाराला मारहाण केली. यामुळे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. पण प्रश्न असा आहे की, ही जी सर्व परिस्थिती आहे, आज महाराष्ट्रात जो गुंडाराज सत्तापक्षाकडून सुरु झालेला आहे, हे अशोभणीय आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही”, असं नाना पटोले म्हणाले.
विधानभवन परिसरात नाना पटोले अन् राहुल नार्वेकर समोरासमोर आले, पुढं काय घडलं?
“कायदा हातात घेण्याचा अधिकार आम्ही या लोकांना दिलेला नाही. ह्यांचे आमदार गणपती विसर्जणाच्या मिरवणुकीच्या वेळीदेखील गोळ्या झाडताना आम्ही पाहिलेले आहेत. महाराष्ट्रात चाललं काय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये आपापसातलं गँगवार चालला आहे. एकनाथ शिंदे कशासाठी गेले आहेत, काय झालं ते मला इथे सांगता येणार नाही. या सरकारमध्ये गँगवार चालला आहे. त्या गँगवारची माहिती सांगायला एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

