• Fri. Mar 20th, 2026

    ठाकरेंच्या एकीचं बळ, शिंदेसेनेत खळबळ; शह देण्यासाठी ‘ऑपरेशन’ सुरु, लवकरच मोठा भूकंप?

    ठाकरेंच्या एकीचं बळ, शिंदेसेनेत खळबळ; शह देण्यासाठी ‘ऑपरेशन’ सुरु, लवकरच मोठा भूकंप?

    ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे शिवसेनेमध्ये धाकधूक वाढली आहे. यामुळे शिंदेसेना अधिक सतर्क झाली असून, ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: ठाकरेंच्या एकीची आणि त्यांच्या संभाव्य युतीची चर्चा असताना शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. शिवसेना उबाठाला खिंडार पाडण्यासाठी आता शिंदेसेना पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ला गती देणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे गळाला लावण्याचे प्रयत्न शिंदेसेनेकडून पुन्हा केले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना ऑपरेशन टायगरला वेग देणार आहे.

    शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे गेल्या शनिवारी एका व्यासपीठावर सोबत आले. सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर दोन्ही ठाकरेंच्या पक्षांकडून विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात दोन्ही ठाकरेंची भाषणं झाली. उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर आता शिंदेंची शिवसेना सावध झाली आहे.

    उद्धव ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केलेला आहे. पण अद्याप त्याला राज ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला नाही. ठाकरे बंधूंची युती होण्याची दाट शक्यता लक्षात घेता शिंदेसेनेनं त्यांचा मुकाबला करण्याची तयारी आतापासूनच सुरु केलेली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेला ठाकरेंच्या युतीचा फटका बसू शकतो. त्यामुळे या पाचही ठिकाणी शिंदेसेनेचे नेते अधिक सक्रिय झालेले आहेत.

    शिंदेसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधले जाऊ लागले आहेत. ‘येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमधील विरोधी पक्षातील नेते आमच्या पक्षात येतील. कार्यकर्त्यांचेही पक्षप्रवेश होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी ही मंडळी पक्षांतर करतील,’ असं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं.

    आमच्या काही नेत्यांनी उबाठाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधले आहेत. आमचे नेते सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती शिंदेसेनेच्या नेत्यानं दिली. विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांनी ऑपरेशन टायगर हाती घेत ठाकरेंचे अनेक शिलेदार गळाला लावले होते. विधानसभेला पराभूत झालेल्या अनेक नेत्यांना शिंदेसेनेत प्रवेश देण्यात आला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा