सातारा येथे एका विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. आरोपी अक्षय साबळे याने लग्नासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. पोलिसांनी त्याला अवघ्या 12 तासांत पुण्यातून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा आणि अक्षय यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. अक्षयने तिला लग्नासाठी विचारले होते. तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती. पण आधीच विवाहित असलेली पूजा लग्नासाठी तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये वाद होते. 7 जुलै रोजी दुपारी पूजा घरी एकटी असताना अक्षय तिच्या घरात घुसला.
पोलिसांनी सांगितले की, पूजाचे घर गावापासून एक किलोमीटर दूर आहे. तिथे फक्त पाच-सहा घरे आहेत. दुपारी सगळे शेतात कामाला गेले होते. त्यामुळे वस्तीवर कोणी नव्हते. पूजाचा नवरा कामावर गेला होता. तिचे सासू-सासरे शेतात गेले होते. अक्षयने हीच संधी साधून तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी अक्षय आणि पूजा यांच्यात लग्नावरून वाद झाला. रागाच्या भरात अक्षयने चाकूने तिचा गळा चिरला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो तिथून पळून गेला.
अडीच वर्षांचा शंभूराज अचानक गायब, शोध घेऊनही सापडेना; 3 दिवसांनी घडला चमत्कार, म्हसोबा मंदिरात…
गावातील लोकांना पूजा आणि अक्षयच्या प्रेमसंबंधाबद्दल कुणकुण होती. त्यामुळे पोलिसांना आरोपी शोधायला जास्त वेळ लागला नाही. आरोपीचे नाव समजल्यावर पोलिसांनी त्याला शोधायला सुरुवात केली. मात्र तो पळून गेला होता. पोलिसांनी तांत्रिक मदतीने त्याचा पत्ता शोधला आणि सातारा ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातून पकडले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी सांगितले की, “संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली आहे.” सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

