Raigad Politics : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अदिती तटकरे यांना हे पद मिळालं होतं, असं थोरवे म्हणाले. रायगडमधील निधी दुसरीकडे वळवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर भाजप नेते दीपक बेहरे यांनी थोरवेंचे वक्तव्य चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत नाराजीचा सूर चढला आहे. महायुतीत तणाव वाढत चालला आहे. कर्जत येथील आषाढी एकादशी सोहळा आटोपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
महेंद्र थोरवे नेमकं काय म्हणाले?
आमदार थोरवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं. आता मात्र भाजप सरकार असूनही, शिवसेनेच्या आमदारांना हे पद मिळत नाही, हे दुर्दैव आहे,” असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले. थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. “रायगडमधील विकासकामांसाठीचा निधी तटकरे यांच्या माध्यमातून दुसरीकडे वळवला जातोय. शिवसेनेच्या आमदारांना विकासासाठी दुय्यम वागणूक दिली जाते,” असा आरोपही त्यांनी केला.
रायगड पालकमंत्री पदावरुन वातावरण तापतंय
शिवसेनेने सार्वजनिकरित्या आता मंत्री भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्रिपदावर नियुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील समस्यांचा अनुभव आहे, असे कारण पुढे करण्यात आले आहे. या वादामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. शिवसेनेने आतापर्यंत राष्ट्रवादीवर टीका केली होती, मात्र आता थेट फडणवीसांवर लक्ष केंद्रीत केल्याने वातावरण अधिक तापलं आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
काठावर पास नाही ५ हजारांच्या लीडने जिंकलो, तुम्हाला शिवसेनेचं वादळ दाखवून देऊ, थोरवे तटकरेंवर बरसले
भाजपची भूमिका काय?
दरम्यान, या वादावर आता भाजपकडूनदेखील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. रायगडमध्ये सर्वाधिक आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. पालकमंत्री भाजपचा हवा होता. मात्र भाजप पक्ष धोरण मानतो. आमदार थोरवे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळवून देण्यात एकनाथ शिंदे कमी पडले. त्यांनी त्यांची तुलना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर करायला हवी होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दुषणं देऊ नये, अशी भूमिका दीपर बेहरे यांनी मांडली.

