• Fri. Mar 6th, 2026
    विधानसभा इतर कामकाज – महासंवाद

    दिवंगत सदस्य कृष्णराव भेगडे यांना विधानसभेत श्रद्धांजली

    मुंबई, दि. २: विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत कृष्णराव भेगडे यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्य भेगडे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्याच्या स्मृतींना उजाळा दिला.

    ०००

    एकनाथ पोवार/विसंअ/

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. २ : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडविणे, शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेलच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले.

    उपमुख्यमंत्री पवार विधानसभेत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

    शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.

    ०००

    संजय देशमुख/ज.सं.अ./

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed