• Sat. Jun 6th, 2026

    उद्धव ठाकरेंकडून हिंदीसक्तीच्या शासन निर्णयाची होळी; आझाद मैदानावर विविध पक्षांचं एकत्रित आंदोलन

    उद्धव ठाकरेंकडून हिंदीसक्तीच्या शासन निर्णयाची होळी; आझाद मैदानावर विविध पक्षांचं एकत्रित आंदोलन

    Uddhav Thackeray Protest at Azad Maidan : महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाविरोधात मराठी अभ्यास केंद्राने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन आयोजित केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या जीआरची होळी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : महाराष्ट्रात शालेय शिक्षणात इयत्ता पहिलापासून हिंदी भाषेचं शिक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून शासनाच्या या निर्णयाला प्रचंड विरोध केला जातोय. मराठी अभ्यास केंद्राकडून आज मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनात स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ठाकरेंच्या पक्षाकडून राज्यभरात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाची होळी केली जात आहे. मुंबईच्या आझाद मैदानातही तेच करण्यात आलं आहे.

    आझाद मैदानावरील आंदोलनात मनसे नेते नितीन सरदेसाई आणि काँग्रेसचे नेतेदेखील सहभागी झाले आहेत. आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी झालेली बघायला मिळत आहे. सर्वपक्षीय नेते, कलाकार असे अनेक मंडळी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी हिंदी भाषा सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी हिंदीसक्तीच्या जीआरची होळी केली. यावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली.

    ‘आम्ही हिंदीची सक्ती लादू देणार नाहीत’, ठाकरेंची भूमिका

    “आम्ही दबाव आणू इच्छित नाहीत. आम्ही हे स्वीकारतच नाहीयत. ते एखादी गोष्ट लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीने तो विषय संपवला आहे. आम्ही त्या जीआरची होळी केली आहे. त्यामुळे तो जीआर आहे असं मानण्याचं कारण नाही. आम्ही हिंदीची सक्ती लादू देणार नाहीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    “अजित पवार म्हणाले की, मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाहीत. ही आनंदाची गोष्ट आहे. कोणीतरी एक धाडस दाखवत आहे. सर्वचजण गुलाम झालेले नाहीत. त्याबद्दल कौतुक आहे. मोर्चा कशासाठी काढावा लागतोय? हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेवर जो अन्याय होतोय त्यासाठी हा मोर्चा निघतोय. सगळ्यांची मुलं त्या वयात मुलं मोठी होत असतात. त्यांच्यावर त्या वयात किती भार टाकणार? हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे”, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी मांडली.

    “आम्ही त्यावेळेला अभ्यास केला. पण त्या अभ्यासाचं काय झालं हे कुणी सांगत नाहीय. कुणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला? कुणी लादला हे सुद्धा अजित पवारांनी जाहीर केलं तर बरं होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना 5 तारखेचा मोर्चा भव्य होईल का? असं विचारलं, त्यावर “येत्या 5 जुलैचा मोर्चा हा भव्य नाही. तर महाभव्य मोर्चा असेल”, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा