Dombivli News : डोंबिवलीमधील प्रसिद्ध शाळेच्या बसला लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर “माय मरो, ‘मौसी’ जगो” असा मथळा लावण्यात आला आहे. सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा घेतलेल्या निर्णयाला राज्यात विरोध होत आहे. याचबाबत या बॅनरमध्ये लिहिलं आहे.
काय लिहले आहे बॅनरवर?
“माय मरो… ‘मौसी’ जगो! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, मराठी आणि मराठी भाषा ह्या हळूहळू, अडगळीत जाताना दिसून येत आहेत! मराठी माणसाच्या चाळी पाडून, आवाक्याबाहेर किमतीचे मोठमोठे टॉवर्स उभे रहात आहेत आणि तेथे राहाणे परवडत नाही, म्हणून तो मुंबई बाहेर फेकला जातोय. मुंबईतून मराठी माणसाचा टक्का कमी झाला आहे. मराठी चित्रपटांना, थिएटर्स मिळत नाहीत. रोजगार बाबतीत तर मराठी पाऊल पडते मागे ! आणि आता, सर्व शाळांमध्ये, १ ली- पासून, २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास, हिंदी सक्तीची! ह्या राज्यात, १० वी पर्यंत, सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य असूनही बऱ्याच हाय प्रोफाईल शाळा, ७/८ वी नंतर, मराठीला ‘अलविदा’ करतात ह्याबद्दल शिक्षण विभाग मूग गिळून गप्प आहेत”, असं बॅनरमध्ये म्हटलं आहे.”मराठीला नुसता अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी अस्मिता जागी राहणार नाही! इतर भाषाही वंदनीय आहेत पण म्हणून, त्या, आमच्या लहान मुलांनी, मनाविरुद्ध, केवळ सक्ती आहे, म्हणून शिकाव्यात? कदापिही नाही! शाळा, शिक्षक आणि पालकांना काय पाहिजे हे बघावे. Board Room Generals सारख्या तज्ञांच्या सल्ल्याने नको”, असं बॅनरवर म्हटलं आहे.

