• Tue. Jun 30th, 2026

    छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लोकाभिमुख उपक्रम- मंत्री छगन भुजबळ   – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 27, 2025
    छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर लोकाभिमुख उपक्रम- मंत्री छगन भुजबळ   – महासंवाद

    नाशिक, दि.२७ जून : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा महत्त्वाचा व लोकाभिमुख उपक्रम शासनाकडून सुरु  करण्यात आला असून हे अभियान  नागरिकांच्या महसूल संबंधित तक्रारी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राबवले जात आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

    येवला शहरातील माऊली लॉन्स येथे तहसील कार्यालय येवला आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, कृषी अधिकारी शुभम बेरड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकडे, संजय कुसावळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्न निकाली काढून नागरिकांच्या सोयीचे आहे. यात शेतकरी बांधवासाठी ७/१२ उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी,वारस नोंद, जाती,उत्पन्न,राहिवासी दाखले, जुने दस्त नोंदवही व पडताळणी,मालमत्ता नोंदणी, जमिनीचे वर्गीकरण व मोजणी यासह विविध योजनांचे लाभ, दाखले नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. हे अभियान एक दिवसापुरते मर्यादित न ठेवता, गावोगावी, तालुक्याच्या पातळीवर, नियमितपणे आणि संपूर्ण सहभागासह राबविले जावे. तसेच प्रत्येक प्रलंबित प्रकरणाचा निकाल वेळेत, न्यायाने आणि पारदर्शकतेने दिला गेला पाहिजे हीच खरी जनतेची सेवा असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

    आज आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 1 हजार 300 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रदान केले जात आहेत. तहसील कार्यालयाच्या तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून 25 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येणार असल्याचे उप विभागीय अधिकारी  श्री. गाढवे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

    येवला तहसील कार्यालयाने सन 1953 पासूनच्या 7/12 च्या 9 लाख नोंदी स्कॅन करून डिजिटल स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी एकूण 1 हजार 343 लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभाचे प्रदान प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.  यात शासन आपल्या दारी अंतर्गत स्वयं सहायता गट धनादेश वाटप, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास दाखले,  उत्पन्न दाखले, गोल्डन कार्ड, महिलांना बेबी केअर किट, आभा कार्ड, डिबिटी लाभ, कुपोषित आहार किट, संगणक संच, शेततळे अस्तरीकरण लाभ, कर्जमुक्ती दाखले, स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ, फळपीक विमा, रोटाव्हेटर पेरणी यंत्र, नांगरणी यंत्र,  ट्रॅक्टर वाटप, घरकुल लाभ, सिंचन विहीर लाभ, वृक्ष लागवड, लखपती दीदी, भुईमूग बियाणे वाटप, पीठ गिरणी, सनद वाटप, प्रॉपर्टी कार्ड वाटप यांचे वाटप मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed