• Sat. Mar 7th, 2026

    Thane News : शहापूरमध्ये आढळला ड्रोन, तालुक्यात एकच खळबळ, पोलीस अलर्टवर, नेमकं काय घडलं?

    Thane News : शहापूरमध्ये आढळला ड्रोन, तालुक्यात एकच खळबळ, पोलीस अलर्टवर, नेमकं काय घडलं?

    Authored by: चेतन पाटीलContributed by: प्रदिप भणगे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    Drone Found in Shahapur : शहापूरमध्ये डोंगरावर असलेल्या एका झाडावर ड्रोन कोसळला. तिथे खेळत असलेल्या मुलांनी तो ड्रोन गावात आणला. ड्रोन आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. भारत-पाकिस्तान तणावावरुन या ड्रोनबाबत अनेकांकडून शंका व्यक्त करण्यात आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रदीप भणगे, कसारा : भारत-पाकिस्तान तणाव सध्या निवळला आहे. गेल्या आठवड्यात भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. पाकिस्तानकडून भारतावर थेट ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन जमीनदोस्त केले. या ड्रोन हल्ल्यामुळे सीमाभागात भीतीचं वातावरण होतं. पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या हवाई हद्दीत कशाप्रकारे घिरट्या मारत होते ते आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आता ड्रोन म्हटलं की धडकीच भरणारी वस्तू आहे. त्याचा प्रत्यय शहापूरमध्ये बघायला मिळाला. शहापूरमध्ये एका डोंगरावर ड्रोन पडला आणि मोठी खळबळ उडाली.

    कसारा जवळील फुगाळे गावातील आघानवाडी गावात एका डोंगरावर आकाशात उडणारा ड्रोन अचानक खाली कोसळला. त्यामुळे डोंगरावर खेळत असणाऱ्या मुलांमध्ये एकच घबराट उडाली. गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास आघानवाडीतील लहान मुलं डोंगरावर खेळत होते. अचानक आकाशातून मोठा आवाज करत, हवेत घिरट्या घालणारा मोठा ड्रोन एका झाडावर पडला. ड्रोनचा मोठा आवाज येत असल्याने खेळणाऱ्या मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलांना या ड्रोनबाबत कुतूहल वाटल्याने त्यांनी विमान पडले, विमान पडले अशी आरडाओरड केली. त्यांनी झाडावर पडलेले विमान झाडावरून खाली उतरवले. यानंतर ते विमान डोंगराच्या खाली वस्तीजवळ आणले. गावाचे सरपंच जिवा भला यांनी याबाबत तात्काळ कसारा पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांना माहिती दिली.
    Dharashiv News : तुळजाभवानी मंदिरात 12 पुजाऱ्यांना प्रवेशबंदी, नेमकं कारण काय?
    कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली असता सदर ड्रोन एका सर्व्हेसाठी उडवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा विभागाचा वाडा तालुक्यात सर्व्हे सुरु होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पायोनियर इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने ड्रोनच्या मदतीने सर्व्हे सुरु केला होता. सर्व्हे सुरु असताना ड्रोनची दिशा भरकटल्याने सदर ड्रोन शहापूर तालुक्यातील फुगाळे आघानवाडी येते डोंगरावरील एका झाडावर पडला असल्याची माहिती ठेकेदार कंपनीने कसारा पोलिसांना दिली आहे.

    संपूर्ण शहापूर तालुक्यात खळबळ

    दरम्यान, देशावर युद्धाचे सावट होते. ते आता कुठे तरी थांबले असताना पुन्हा काही कुरापती सुरु झाल्या का? असा संशय अनेक तालुकावासियांनी व्यक्त केला. पण वाडा तालुक्यात होऊ घातलेल्या धरणाचा सर्व्हे सुरु असल्याची खात्री पटताच तालुकावासियांनी सुटकेचा श्वास सोडला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed