• Fri. Mar 6th, 2026

    Murali Naik : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात घाटकोपरचे जवान मुरली नाईक शहीद

    Murali Naik : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात घाटकोपरचे जवान मुरली नाईक शहीद

    India Pakistan Tension : जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात भारतीय लष्कराचे जवान मुरली नाईक शहीद झाले. ते घाटकोपरचे रहिवासी होते. त्यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आहेत. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : पाकिस्तानकडून सातत्याने एलओसीवर गोळीबार केला जातोय. या गोळीबारात कालपर्यंत 16 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आली होती. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देखील देण्यात येत आहे. पाकिस्तानने काल ड्रोन हल्ले देखील करण्याचे प्रयत्न केले. ते हल्लेदेखील भारताने हाणून पाडले. हे हल्ले सुरु असतानाच पाकिस्तानच्या लष्कराकडून सीमाभागात गोळीबार सुरु होता. या गोळीबाराला भारतीय लष्कर प्रत्युत्तर देत होतं. या दरम्यान घाटकोपर येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्यातील जवान मुरली नाईक शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. मुरली नाईक शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करत होते. शत्रूंना चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना सीमेवर वीरमरण आले.

    मुरली नाईक हे घाटकोपरच्या कामराज नगर येथील रहिवासी आहेत. मुळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंबिय हे सध्या घाटकोपरच्या कामराज नगर येथे वास्तव्यास होते. या दुखद घटनेमुळे नाईक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुरली नाईक यांच्या वडिलांनी खूप कष्ट करुन त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मुरली नाईक खूप परिश्रम करुन सैन्यात भरती झाले होते. मुरली हे तरुण होते. ते काही दिवसांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते. ते सैन्यात भरती झाल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. तसेच मुरली यांचे वडील हे कामराज नगरात सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असायचे. ते समाजसेवक आहेत. त्यामुळे नाईक कुटुंबियांना घाटकोपरच्या कामराज नगर परिसरात सर्वजण ओळखतात. मुरली नाईक यांना वीरमरण आल्यानंतर कामराज नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

    कामराज नगर परिसराचा पुनर्विकास होत आहे. त्यामुळे नाईक कुटुंबिय हे त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळगावी तात्पुरते राहायला गेले होते. कामराज नगरचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर नाईक कुटुंबिय पुन्हा कामराज नगर येथे वास्तव्यास येणार होते. पण याच दरम्यान नाईक कुटुंबाचा सुपुत्र सीमेवर शहीद झाला आहे. या घटनेमुळे घाटकोपरसह आंध्र प्रदेशमध्ये देखील शोककळा पसरली आहे.

    आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली अर्पण

    मुरली नाईक यांचं आंध्र प्रदेशच्या श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्ली थांडा हे मूळ गाव होतं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देखील मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद मुरली नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो”, अशा शब्दांत चंद्राबाबू नायडू यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed