Mumbai Alert : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. NIA कडून या हल्ल्याचा तपास सुरु असून, पुरावे गोळा केले जात आहेत.
दहशतवाद हल्ल्याच्या घटनांचा इतिहास पाहिला तर मुंबईचं या हल्ल्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. मुंबईत एकेकाळी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. तसेच त्यानंतर 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या जखमा कधीही भरुन निघणार नाहीत, अशा आहेत. पहलगाम येथील हल्ल्यानंतर अतिरेक्यांकडून पुन्हा मुंबईवर लक्ष्य केलं जाऊ शकतं. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे कोट्यवधी नागरीक राहतात. याआधीच्या हल्ल्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर (सीएमएमटी) येऊन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.
सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवली
पहलगाम येथील हल्ल्यानंतर आता मुंबईतदेखील अलर्ट जारी करण्यात आलं आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफ यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. खबरदारी म्हणून सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात झाली आहे. तसेच सीएसएमटी स्थानकाच्या सुरक्षेची आज संध्याकाळी सात वाजता पाहणी केली जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईत पोलीस हाय अलर्टवर आहेत. तसेच सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे.
एनआयएकडून तपासाला वेग
एनआयएकडून तपासाला वेग आल्याची माहिती आहे. एनआयएने घटनास्थळावरुन गोळा केलेले नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. एनआयडीकडून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचेदेखील जबाब नोंदवणं सुरु आहे.

