• Sat. Jun 20th, 2026

    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई-बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 25, 2025
    पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई-बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

    पुणे, दि. २५ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दीड हजार बसेस दाखल होणार आहेत. मेट्रो मार्गांचा विस्तार, बाह्य वर्तुळ मार्ग, बससेवांचा विस्तार आदी माध्यमांतून येथील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासह नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

    पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या चऱ्होली बु. येथील ई- बस डेपोचे तसेच माण ई- बस डेपोचे (ऑनलाइन पद्धतीने) उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळीते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ – मुंडे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आदी उपस्थित होते.

    माण डेपोला ३० ई- बसेस, चऱ्होली डेपोला ६० ई- बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पीएमपीएमएलला बसेस घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २३० कोटी रुपये रक्कम दिली असून त्यातून लवकरात लवकर ५०० सीएनजी बसेस घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच पुणे महानगरपालिकेला १५० कोटी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १०० कोटी रुपये द्यावेत त्यातून अजून ५०० सीएनजी बसेस घेण्यात येतील. त्याव्यतिरिक्त अजून ५०० इलेक्ट्रिक बसेस जीसीसी तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. अजूनही टप्प्या-टप्प्याने बसेस घेण्यात येतील. या ई-डेपोच्या माध्यमातून राज्य शासनाचा ग्रीन महाराष्ट्र हा दृष्टीकोन समोर येतो, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

    श्री. पवार यांनी पुढे माहिती दिली, शहरातील वाहतुकीला चालना आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी महाराष्ट्र राज्य् रस्ते विकास महामंडळामार्फत बाह्य वर्तुळ मार्गाचे काम सुरू असून पीएमआरडीकडूनही आतील वर्तुळ मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. याशिवाय मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. प्रत्येकी २० टक्के रक्कम केंद्र व राज्य शासन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका १० टक्के रक्कम आणि उर्वरित ५० टक्के रक्कम वित्तीय संस्थांमार्फत उभी करून दोन्ही शहरात मेट्रो मार्गाचे जाळे उभारण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रोला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी आणि नळ स्टॉप्- वारजे- माणिकबाग मेट्रोसाठीही केंद्र शासनाकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला आहे, असेही ते म्हणाले.

    पीएमपीएमएलच्या कामगारांसाठीही चांगले निर्णय घेण्यात आले असून २०१५ साली वर्षभरात २४० दिवस नियमित कामावर असणाऱ्या १ हजार ४६७ बदली कामगारांना तसेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये १ हजार ७०० बदली कामगारांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम चार टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

    पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरे स्मार्ट सिटी प्रगत, सुरक्षित आणि समतोल नागरी जीवनशैलीचे आदर्श प्रारुप बनावे यासाठी प्रशासन आणि शासनासोबत जनतेने काम करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

    पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २०४१ साली ६१ लाख होण्याचा अंदाज असून या लोकसंख्येला पाणी, रस्ते, मेट्रो, रेल्वे, वाहतूक सेवा चांगली प्रकारे मिळावी यासाठी नियोजन सुरू आहे. शहराला पवना आणि आंद्रा धरणाचे पाणी देण्यात येत असून ठोकरवाडी धरणाचे पाणीही मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुळशी धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

    कामगार, कष्टकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न गटातील (ईडब्ल्यूएस) कुटुंबांना घरकुले मिळावीत यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 30 हजार घरे तर ग्रामीण भागात ५ हजार घरांचे निर्माण होत आहे. हे करत असताना प्रधानमंत्री आवास योजनेतून २ लाख ५० हजार रुपये, बांधकाम कामगार असल्यास बांधकाम कामगार महामंडळाकडून २ लाख रुपये तसेच प्रत्येक घरासाठी सूर्यघर योजनेतून सौरवीजेसाठी ३० हजार रुपये दिले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

    श्रीमती मुधोळ- मुंडे म्हणाल्या, महामंडळाच्या सेवेत १ हजार ९६७ बसेस असून रोज ३ लाख १० हजार कि.मी. धावतात. यातून दररोज सुमारे १२ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. सध्या १५ बसडेपो असून आज २ ई-बस डेपो सेवेत दाखल होत आहेत. महामंडळाच्या सेवेत मोठ्या प्रमाणात बसेस याव्यात यासाठी नियोजन सुरू आहे. आपली पीएमपीएमएल मोबाईल ॲपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. डिजिटल पुढाकारांबद्दल राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कारही महामंडळाला मिळाले आहेत. भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन स्मार्ट बस सिस्टीम ही कंडक्टर विरहीत सेवा सुरु करण्याचा मानस ठेवला असून सुरक्षितता आणि अपघातविरहीत सेवा हे ध्येय ठेऊन पीएमपीएमएल काम करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

    प्रारंभी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    श्री. पवार यांच्या हस्ते बस डेपोंचे उद्घाटन व लोकार्पण झाल्यानंतर ई- बसेसचेही लोकार्पण त्यांनी केले, तसेच बसेसची पाहणी केली.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed