Pahalgam Terror Attack Updates : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात संजय लेले यांच्यासह अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचाही मृत्यू झाला. संजय यांचा मुलगा हर्षलने आपल्याला आलेल्या भयानक अनुभवाची आज माहिती दिली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तीनही मृतकांच्या कुटुंबियांनी आज डोंबिवलीत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्याला आलेल्या भयानक अनुभवाची माहिती दिली. संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने आपल्याला आलेल्या भयानक अनुभवाची माहिती दिली.
“गोळ्या चालल्या त्यावेळी माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलं की काहीतरी इथे पडलंय. मला असं वाटलं की, माझ्या हातावर गोळी मारली आहे. नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं. माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताने माखले होते”, असं हर्षल म्हणाला. यावेळी हर्षलला रडू कोसळलं. पण तरीही तो धीराने पुढे बोलू लागला.
“आम्हाला तिथल्या स्थानिकांनी सांगितलं की, ह्यांना आर्मीचे लोकं वाचवतील. तुम्ही आधी तुमचा जीव वाचून इथून निघून जा. तिकडे वरती घोड्याने जावं लागतं. तिथे केवळ घोडेच जातात. बाकी कुठली गाडी किंवा सायकलचा पर्याय नाही. जेवढे घोडे होते तेवढ्या घोड्यांवर जात होते. उरलेले चालत-चालत जात होते. घोड्याने उतरायला तीन तास तर आम्हाला चालत उतरायला चार तास लागले”, असं हर्षलने सांगितलं.
‘आईला डाव्या बाजूने पॅरालेसिस’
“माझ्या आईला डाव्या बाजूने पॅरालेसिस आहे. तिला मी आणि भावाने कसंतरी उचलून खाली आणण्याचा प्रयत्न केला. नंतर ती स्वत: थोडावेळ चालली. सुदैवाने आम्ही ज्या घोड्याने वरती गेलो होतो तो तिथे नशिबाने पोहोचला. त्याद्वारे आईला आम्ही खाली आणलं. तर मी आणि माझा भाऊ पायी चालत गेलो. आम्ही मामी आणि इतरांना आधीच खाली पाठवलं होतं. त्यामुळे ते आईला घेऊन दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते. तिकडच्या सरकारने आमच्यासाठी अरेजमेंट केली होती. तिकडे आम्हाला बसवलं होतं. आम्ही संध्याकाळी चार पाच तास तिथे बसलो होतो. मला संध्याकाळी सहा वाजता तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. पण तिथल्या अधिकाऱ्यांनी मला कुणालाही ते सांगायला लावलं नव्हतं”, असं हर्षल म्हणाला.
“माझे काका राजेश काका यांनी तिथल्या आयपीएस अधिकाऱ्यांशी बातचित केली होती. त्या आयपीएस यांनी त्यांच्या मित्राकडे आमची रात्रभर राहण्याची सोय केली. त्यांचं जिमी असं नाव होतं. त्यांनी मदत केल्यामुळे त्यांचा आभारी आहोत. त्यांनी रात्री माझ्या हाताला लागलेलं पाहून रुग्णालयात नेलं होतं. मला इंजेक्शन वगैरे दिले, एक्स-रे काढून दिला. त्यात सगळं नॉर्मल असल्याचं समोर आलं”, असं हर्षल म्हणाला.
‘ मी बॉडी ओळखल्यानंतर सर्वांना कळवलं’
“मला सकाळी सात वाजता बॉडी ओळखण्यासाठी बोलावलं. तोपर्यंत कुणाला सांगितलं नव्हतं. मी बॉडी ओळखल्यानंतर सर्वांना कळवलं. त्यानंतर आम्हाला पीसीआरमध्ये बोलावलं. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तिथले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला होते. आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर आले होते. तिथे आमची बोलणी केली. तिथे असं समजलं की चार वर्षाच्या मुलालादेखील लागलं आहे”, असं हर्षल म्हणाला आणि त्याला हुंदका दाटून आला. माझे काका आणि इतर नातेवाईक आम्हाला घ्यायला आले होते. त्यानंतर आम्ही तिथून संध्याकाळी डोंबिवलीला आलो, असंही हर्षलने यावेळी सांगितलं.
‘चित्रपटात दाखवले जातात तसेच ते दहशतवादी दिसत होते’
“आम्ही गोळीबार करताना दोन लोकांना पाहिलं. पण गोळीबाराच्या आवाजावरुन आणखी लोकं असतील असा अंदाज आहे. मी दोन लोक स्वत: पाहिले. दहशतवाद्यांच्या डोक्यावर गो प्रो कॅमेरा होता. ते समोरुन आले आणि आम्ही सर्वजण खाली झोपलो. दहशतवादी ५ ते १० मिनिटे आमच्यासमोर होते. पर्यंटनस्थळावर कोणतीही सुरक्षा नव्हती. एखाद्या चित्रपटात दाखवले जातात तसेच ते दहशतवादी दिसत होते. त्यांनी ब्राउन रंगाचे कपडे परिधान केलेले होते”, अशी माहिती हर्षलने दिली. यावेळी त्याने सर्व देशाला आपल्या पाठिमागे खंबीरपणे उभं राहण्याची विनंती केली. तसेच “जेवढे अतिरेकी आहेत, मग ते कोणत्याही बॉर्डरवर असतील तर त्यांना थेट संपवलं पाहिजे”, असं हर्षल यावेळी म्हणाला.

