• Tue. Jun 16th, 2026

    Gunaratna Sadavarte : ‘दारुची दुकानं बंद करण्यासाठी निवेदन द्याना, तेव्हा तुमची मर्दांगी कुठे जाते?’, सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात

    Gunaratna Sadavarte : ‘दारुची दुकानं बंद करण्यासाठी निवेदन द्याना, तेव्हा तुमची मर्दांगी कुठे जाते?’, सदावर्तेंचा राज ठाकरेंवर घणाघात

    Gunaratna Sadavarte News : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज ठाकरे यांनी स्वत:च्या गलिच्छ राजकारणाखातर, हेतूशुन्य राजकारणाखातर, स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे”, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. “या राज्यात कधीच भाषिक वाद होऊ नये यासाठी एक जबाबदार नागरीक म्हणून तथा हिंदुस्तान मजदूर संघाच्या वतीने आज जबाबदारीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलो आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत असताना राज ठाकरे यांनी स्वत:च्या गलिच्छ राजकारणाखातर, हेतूशुन्य राजकारणाखातर, स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करुन कशाप्रकारे शाळा आणि पुस्तकालय टार्गेट केलं जावं ते सांगितलं. हे अत्यंत विदारक आहे. कोणताही राजकारणी एवढं तालिबानीप्रमाणे वागलं नसेल”, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

    “राज ठाकरे यांचं वर्तन अत्यंत दुखद आहे. राज ठाकरेंना कायदा कळतो की नाही? असा प्रश्न उपस्थित करणारा आहे. राज ठाकरेंनी नवे शैक्षणिक धोरण न वाचता स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे. आम्ही आज पोलिसांना नॅशनल इज्युकेशन पॉलिसी दिली आहे. त्याचा अभ्यास करुन राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पॉलिसी दिली. तसेच शासन निर्णयही दिला आहे. ही सर्व कार्यप्रणाली पाहता राज ठाकरेंवर कारवाई व्हावी यासाठी तक्रार दाखल करत आहेत”, असं सदावर्ते यांनी सांगितलं.

    ‘राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुंड पद्धतीने…’

    “राज ठाकरे यांचे कार्यकर्ते ज्याप्रकारे एकत्रित होऊन सार्वजनिकपणे इतरांना त्रास होईल, असं शिवाजी पार्क पोलीस ठाणे हद्दीत, सेना भवनाच्या समोर शासनाच्या केलेला हिंदी भाषेचा कायदा म्हणजेच शासन निर्णय दहन केलेला आहे. ही कृती अत्यंत चुकीची आहे. बेकायदा आहे. त्याचबरोबर असंविधानिक आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी संहितेत बसणारी आहे. राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गुंड पद्धतीने कायद्याचा भंग करत फ्लेक्स लावले. त्यावर हम हिंदू हैं हिदी नाही, असं लिहिलं. हे भाषिक लोकांमध्ये वाद निर्माण करणारं आणि जातीय तेढ निर्माण करणारं आहे”, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

    ‘अरे आजूबाजूला दारुची दुकानं…’

    “अरे आजूबाजूला दारुची दुकानं आहेत ती बंद करण्यासाठी निवेदन द्याना. तेव्हा तुमची मर्दांगी कुठे जाते? पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल? अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा. ही मुंबई ज्ञानार्जनाची नगरी आहे. ते न करता तुम्ही धमक्या देताय. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांना प्रतिबंध केलं पाहिजे”, अशा शब्दांत सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed