WhatsApp Down News : व्हाट्सअॅपमध्ये तांत्रिक अडचण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे युजर्सना मेसेज मिळवण्यात आणि पाठवण्यात अडचणी येत आहेत. देशभरातील लाखो युजर्सना या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
युजर्सला काय-काय अडचणी येत आहेत?
युजर्सला व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये मेसेज टाकण्यास अडचणी येत आहेत. युजर्स ग्रुपमध्ये मेसेज पाठवत आहेत. पण ते मेसेज डिलिवर होण्यास अडचणी येत आहेत. मेसेज डिलिवरच होत नसल्याने ग्रुपमधील इतरांपर्यंत मेसेज पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे युजर्स वैतागत आहे. युजर्सकडून वारंवार मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण ते शक्य होऊ शकलं नाही. विशेष म्हणजे अधूनमधून सेवा पूर्ववत देखील होत आहे. पण पुन्हा तशाच अडचणी येत आहेत. अर्थात ही समस्या लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.
व्हाट्सअॅप डाऊन झाल्यानंतर #WhatsappDown हा हॅशटॅग ‘एक्स’वर ट्रेडिंगला आला आहे. अनेक युजर्सनी आपल्याला येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला आहे. अनेक युजर्सला तर स्टेटस ठेवण्यात देखील अडचणी येत आहेत. तर अनेकांना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
ऑनलाईन सेवांच्या स्थितीचे निरीक्षण करणारी वेबसाईट डाउनडिटेक्टरकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत एकट्या भारतात, 900 हून अधिक तक्रारी नोंदल्या गेल्या आहेत. त्यापैकी 90 टक्के पेक्षा जास्त जणांनी संदेश पाठविण्यात अडचण येत असल्याचं म्हटलं आहे. उर्वरित अहवालांमध्ये सर्व्हर कनेक्शन समस्या आणि अॅप बिघाड असल्याचे दिसून आले आहे. व्हाट्सअॅप अॅप्लिकेशन आणि व्हाट्सअॅप वेब दोन्हीवर संदेश पाठविण्यात अडचणी येत आहेत. जागतिक स्तरावर, अंदाजे 1 हजार वापरकर्त्यांनी समान समस्या नोंदवल्या आहेत, ज्यामध्ये 91 टक्के लोकांनी मसेज पाठविण्यास अडचण असल्याचं म्हटलं आहे.