Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी भारती पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
“भारती काकी आमच्यात राहिल्या नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्या आम्हा सर्वांना आईसमान होत्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हृदय दुःखाने पिळवटून गेले आहे. त्यांनी सर्व पवार कुटुंबावर निस्वार्थ प्रेम केले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली..!”, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांच्याकडून श्रद्धांजली
सुप्रिया सुळे यांनीदेखील फेसबुकवर पोस्ट करत भारती पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Bharti Pawar : पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर, शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन
युगेंद्र पवार यांच्याकडूनही श्रद्धांजली
शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनीदेखील एक्सवर पोस्ट शेअर करत भारती पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माझ्या आजी सौ भारती प्रतापराव पवार यांचे निधन झाले. ही आम्हा कुटुंबीयांसाठी अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. भारतीआजी म्हणजे आम्हा सर्व नातवंडांसाठी खास होत्या. त्यांच्या निधनामुळे डोक्यावरील मायेचे एक छत्र हरपल्याची भावना आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

