• Mon. Jun 15th, 2026

    दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 16, 2025
    दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. १६, (जिमाका): दख्खन जत्रेच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांतील महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळाली असून, या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

    दख्खन जत्रा 2025 अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या वस्तूंचे व ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादनांच्या विभागस्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, सांगली येथील मैदानावर आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (विकास) विजय मुळीक आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    बचत गट उत्पादीत माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून महिलांना उत्पादन विक्रीची संधी मिळावी, यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले असून, यातील निवड केलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना राज्य स्तरावरील प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. स्वयंसहाय्यता बचत गटांतील महिलांना प्रशिक्षण, उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य व विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लखपती दीदी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यातून महिलांचे कुटुंबाचे आयुष्यमानही सुधारणार आहे, असे ते म्हणाले.

    महिला भगिनी व त्यांचे कुटुंबिय यांचे आयुष्य सुकर व्हावे, यासाठी प्रयत्नरत असून विविध कंपन्यांच्या माध्यमातून गृहिणींना दुपारी मिळणाऱ्या वेळेत काम उपलब्ध करून देण्यासाठी काही कंपन्यांनी सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर महिलांना बँकेचे व्यवहार कळावेत, यासाठीही काम करत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

    प्रदर्शनातून खरेदीसाठी 65 हजारांचा धनादेश

    प्रत्यक्षात प्रत्येक स्टॉलवर जाऊन खरेदी करता आली नसली तरी प्रदर्शनात सहभागी प्रत्येक स्टॉलवरून आपल्यावतीने रूपये पाचशेची खरेदी करावी, यासाठी पालकमंत्री पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे 65 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या रकमेतून खरेदी केलेले साहित्य महिला व मुलींच्या संस्थांना भेटरूपी द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

    विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सांगली, महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषि विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, सांगली येथील मैदानावर 21 मार्चपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

    या प्रदर्शनामध्ये पुणे विभागातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील बचत गटांचे व गावरान खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील 10 स्टॉल्स व सांगली जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी 60 स्टॉल्स, कृषि विभागाचे 10 स्टॉल्स व महिला आर्थिक विकास महामंडळाचे 20 स्टॉल्स असे एकूण 130 स्टॉल्स आहेत. यापैकी 30 स्टॉल जेवणाचे व 100 स्टॉल वस्तूंचे स्टॉल आहेत. तसेच, दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन केले

    यामध्ये अगदी माफक दरात व विविध वस्तू उपलब्ध असल्याने या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

    ०००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed