• Thu. Jun 18th, 2026

    कोयना परिसर पर्यटन हब बनविणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 28, 2025
    कोयना परिसर पर्यटन हब बनविणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा कायापालट करणार

    मुंबई, दि. २८ : सातारा जिल्ह्यातील कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कोयनानगर रिसॉर्टचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

    पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील पर्यटन विषयक कामांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, संचालक बी. एन. पाटील, अधिक्षक अभियंता बोरसे तर दूरदृश्य प्रणाली द्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.

    पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोयना धरण आणि जलाशय परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून, येथे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटनविषयक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये एमटीडीसी रिसॉर्टचा संपूर्ण कायापालट करून आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत.

    कोयनानगर येथील पर्यटन विभागाच्या रिसॉर्टची सद्य स्थिती श्री. देसाई यांनी जाणून घेतली. श्री. देसाई म्हणाले, या ठिकाणी पाच व्ही.व्हीआयपी, पाच व्हीआयपी आणि उर्वरित ठिकाणी कॉटेज तयार करण्याचा प्रस्ताव तयार करावा. या रिसॉर्टच्या जागेसंदर्भात काही प्रश्न असल्याने स्थानिक स्तरावर सोडविण्यात यावेत.

    कोयनानगर येथील नेहरू उद्यान विकसित करण्यासंदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. सध्या तीन एकर जागेवर असलेल्या या उद्यानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर उद्यान वाढवण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रकल्पाच्या कामांमधील अडीअडचणींचा आढावाही पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी घेतला.

    या उपक्रमांमुळे कोयनानगर परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असा विश्वास पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

    ****

    शैलजा पाटील/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed