• Fri. Mar 20th, 2026

    संजय राऊत यांचं नीलम गोऱ्हे यांच्याबाबत खळबळजनक ट्विट, राजकारण तापणार?

    संजय राऊत यांचं नीलम गोऱ्हे यांच्याबाबत खळबळजनक ट्विट, राजकारण तापणार?

    शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. शिवसेनेत एका पदासाठी 2 मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या, असं धक्कादायक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. शिवसेनेत एका पदासाठी 2 मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या, असं धक्कादायक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र पाठवत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

    “नीलम गोऱ्हे यांनी साहित्य महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये दिले आणि ते या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच त्यांनी उषा तांबे यांना मर्सिडीज कार दिली”, असं स्वत: गोऱ्हे यांनी पत्रकारांना सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहित याबाबतचा दावा केला आहे. संबंधित पत्र त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

    संजय राऊत पत्रात नेमकं काय म्हणाले?

    “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१८वे) दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन आणि त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा-परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय?”, असा सवाल संजय राऊत यांनी पत्रात केला.

    “दिनांक २३ फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोन्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय आणि सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
    ‘टायरवाल्या काकू तुमच्या काळ्या टायरचा जाहीर निषेध’, ठाकरे गट नीलम गोऱ्हेंवर तुटून पडलाेो

    “नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, ‘मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले.” हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे”, असं संजय राऊत पत्रात म्हणाले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed