• Sun. Mar 15th, 2026

    पदवीच्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करा – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2025
    पदवीच्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करा – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आवाहन – महासंवाद

    नागपूर, दि. 15 – जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज येथे केले.

    वर्धा रोडवरील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा दीक्षान्त समारंभ आज आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विधी विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कुलगुरु प्रा. डॉ. विजेंदर कुमार, महाराष्ट्राचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, विधी विद्यापीठाचे कुलसचिव विवेक गव्हाणे यांच्यासह विधि क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

    विधि कारकीर्दीत सखोल अभ्यास तसेच कायद्याची समज आवश्यक असते. विधि विद्यापीठातून कायद्याची अक्षर ओळख करून घेण्यासोबतच कायद्यामागची  भूमिका,  इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणे आवश्यक असते. तुमच्या कामामुळे लोकांचे जीवनमान तसेच स्वातंत्र्यावर परिणाम होतो. त्यामुळे विधी कारकीर्द हे महत्त्वपूर्ण असे क्षेत्र ठरते. आयुष्यात स्वयंशिस्त आणि कठोर परिश्रम जोपासत आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करण्याचे आवाहन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केले.

    विधि विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कारकीर्दीचे विस्तीर्ण असे  क्षेत्र खुले आहे. कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आता विविध शाखा उपलब्ध झाल्या आहेत. ज्ञानार्जनासाठी अनेक संधी आज उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन विधि विद्यापीठाचे कुलपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

    तत्पूर्वी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीचा आणि उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. या दीक्षांत समारंभाला विधि क्षेत्रातील मान्यवरांची  तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

    आदिती बैसला सर्वाधिक सात सुवर्णपदके

    पदवीप्रदान समारंभात एकूण १५५ पदवी प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये ११२ पदवी, २८ पदव्युत्तर आणि १५ पीएच.डी. पदव्या समाविष्ट होत्या. सर्वाधिक सात सुवर्णपदके विद्यार्थिनी अदिती बैस यांना मिळाली. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक विद्यार्थी विश्वजीत राव आणि विद्यार्थिनी आकांक्षा बोहरा यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed