Pune Youth Died At Rajgad Fort: प्रजासत्ताक दिनानिमित्त किल्ले राजगडावर फिरायला गेलेल्या एका तरुणाच्या डोक्यात बुरुजाचा दगड पडला, या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
अनिल विठ्ठल आवटे (वय वर्ष १८) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात दगड पडून तो जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्थानिक डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
किल्ला फिरुन झाल्यावर परत जात असताना काळ दगड होऊन कोसळला
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनानिमित रविवारी किल्ले राजगड या किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यावेळी अनिल आवटे हा देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आला होता. अनिल हा पुण्यातील धायरी परिसरात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी खाजगी क्लासेसमध्ये अभ्यास करत होता. तो मूळचा खादगाव भाबट (ता. सेलू, जि. परभणी) येथील राहणारा असल्याची माहिती आहे.
यावेळी किल्ला फिरून झाल्यावर गड उतरत असताना बुरुजाचा एक दगड निसटला आणि तो थेट अनिल याच्या डोक्यात येऊन पडला. दगड डोक्यात पडल्याने त्याच्या कानातून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसही रुग्णालयात पोहोचले, पोलिसांकडून तपास करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अचानक घडलेल्या या घटनेने आवटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गड किल्ल्यावर फिरायला येताना काळजी घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. प्रजासत्तक दिनी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

