• Thu. Jan 23rd, 2025

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लोकचळवळ व्हावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 23, 2025
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लोकचळवळ व्हावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. 23 : राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावे आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. कुर्ला बसस्थानक येथे या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

    स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

    मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणेच आपण जिथे काम करतो, तेथे देखील आपले घर समजून त्या कार्यालयाची, त्या बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात स्वच्छ, सुंदर, सुशोभित बसस्थानके नक्कीच प्रवाशांना आकर्षित करतील.  अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बस प्रवास करण्याचा आनंद त्यांना घेता येईल. अर्थात स्वच्छता हा एक “संस्कार” आहे, तो जसा एसटी कर्मचाऱ्यांनी अंगिकारणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रवाशांनीही तो आपल्या आचरणात आणला पाहिजे. बसस्थानक ही सार्वजनिक जागा आहे. तिथे स्वच्छता ठेवणे ही एसटी कर्मचारी आणि प्रवासी या दोघांची संयुक्त जबाबदारी आहे.

    स्वच्छतेबाबत परदेशात जेवढी सजगता आणि जागरूकता आहे, तेवढी आपल्या देशात नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करून आपली बस स्थानके स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. या स्पर्धात्मक अभियानातून एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आपले बसस्थानक स्वच्छ, सुंदर व टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या माध्यमातून भविष्यात चांगली सुंदर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील, अशी  आशाही मंत्री श्री. सरनाईक यांनी व्यक्त केली.

    एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख यांनी प्रास्ताविक केले, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभियानाची रुपरेषा मांडली, तर उपमहाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला एसटीचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ००००

    नीलेश तायडे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed