• Mon. Jan 13th, 2025
    तिरुपती बालाजी मंदिरावर सशस्त्र दरोडा! बंदुकीचा धाक दाखवून चौकीदारला बांधले,दानपेटीतील लाखोंच्या रकमेवर डल्ला

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 13 Jan 2025, 11:43 am

    Chandrapur crime : शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. संपूर्ण परिसर बघितला. तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे, त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली. त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला. त्यानंतर रात्री १२.३० वाजताच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निलेश झाडे, चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सात सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर चौकिदराला एका खोलीत बांधून ठेवले आणि मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड टाकून दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास घडली. या सशस्त्र दरोड्यामुळे शहरात आता मंदिर देखील सुरक्षित राहिलेले नाही, असे बोलले जात आहे.

    मंदिराचे संपूर्ण निरीक्षण

    दाताळा मार्गावरील ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया हे मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तथा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आहे. अतिशय देखण्या या मंदिरात डिसेंबर महिन्यात नुकताच ब्रह्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शन व पूजाअर्चा करण्यासाठी येतात. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले. संपूर्ण परिसर बघितला. तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे, त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली. त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला.

    सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड

    रात्री १२.३० वाजताच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरे बंद केले. त्यानंतर मंदिरातील चौकीदाराला बंदुकीने धाक दाखवून दोन्ही हात बांधून एका खोलीत बांधून ठेवले. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले. यावेळी सातही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.

    रात्री दोन वाजताच्या सुमारास चौकीदाराने स्वतःची कशीबशी सुटका केली त्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव त्यांची संपूर्ण टीम घेऊन मंदिरात दाखल झाले. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed