• Sat. Jan 11th, 2025

    विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे संशोधक घडतील – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 11, 2025
    विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे संशोधक घडतील – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    नाशिक, दि.11 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्याचे संशोधक आणि शास्त्रज्ञ घडतील, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

    जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूल, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज मंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भास्करराव भगरे, वणीचे सरपंच मधुकर भरसट, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील (माध्यमिक), बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, स्कूलचे अध्यक्ष महेंद्र बोरा, प्राचार्य योगिता चिंचोले, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे आदी उपस्थित होते. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा या प्रदर्शनाचा विषय आहे. तीन दिवस प्रदर्शन सुरू राहील.

    मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, विज्ञानाचे प्रयोग करणाऱ्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यांना पाठबळ दिल्यास विज्ञानात नवीन संशोधक आणि शास्त्रज्ञ घडतील. त्यातून देशाच्या विकासास मदत होईल. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्याना सहकार्य केले जाईल. दिंडोरी येथे सार्वजनिक वाचनालय सुरू केले. पेठला अत्याधुनिक अभ्यासिका सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

    खासदार श्री. भगरे म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध समस्यांवर उपाय शोधले जातील. या प्रदर्शनातून नवीन संशोधक घडतील. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी श्री. शेटे, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार, वणीचे उपसरपंच विलास कड, श्री. बोरा आदींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षणाधिकारी श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed