• Wed. Jan 8th, 2025

    राज्यात खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 7, 2025
    राज्यात खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद




    मुंबई, दि. 7 : राज्यात प्रतिभावंत खेळाडू तयार व्हावेत तसेच खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी व्हावी, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

    मंत्रालयातील दालनात क्रीडा व युवक कल्याण विभागाची आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री श्री. भरणे बोलत होते. आढावा बैठकीसाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त हिरालाल सोनवणे, उपसंचालक नवनाथ फडतरे, सुहास पाटील, उदय जोशी यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. भरणे म्हणाले, क्रीडा संकुलाच्या निधीचे सनियंत्रण व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यांना वेळेत पुरस्कार प्रदान करण्यात यावे, शिवछत्रपती क्रीडा संकुलासह क्रीडा सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना मंत्री श्री. भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत क्रीडा विभागाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

    पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री श्री. भरणे म्हणाले, क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठी  कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार आहे.

    0000

    राजू धोत्रे/विसंअ/

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed