• Wed. Jan 8th, 2025

    ‘संगीत मानापमान’ अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 23, 2024
    ‘संगीत मानापमान’ अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई दि. २३- नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून  मराठी संगीत, नाट्य संगीत हे ही अभिजात आहे. आपली ही कला- संगीताची परंपरा नव्या पिढीसमोर नव्या स्वरूपात येणे गरजेचे आहे. ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट आपले अभिजात मराठी कला आणि संगीत रिइन्व्हेंट करणारा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचे ट्रेलर लाँच मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

    या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेते तथा या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे, अभिनेते सुमीत राघवन, अभिनेत्री वैदेही परशुरामी, अभिनेत्री अमृता खानविलकर, जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे, सुनील फडतरे, निखिल साने, चित्रपटाचे संगीतकार शंकर, एहसान, लॉय यांच्यासह चित्रपटातील सहकलाकार,कलाकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,’संगीत मानपमान‘ हे नाटक गेली ११३ वर्ष मराठी मनाला भुरळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हे अजरामर नाटक नव्या स्वरूपात पाहायला मिळत आहे, याचा आनंद आहे. या चित्रपटांतून संगीत नाटकाच्या नाट्यपदांचे सौंदर्य नव्या पिढीसमोर पोहोचणार आहे असे सांगून या प्रयत्नाबद्दल चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन ही त्यांनी केले.

    मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले, की येत्या काळात मराठी कला आणि कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून काम करण्यात येईल. मराठी चित्रपटांना चांगले प्लॅटफॉर्म मिळावेत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

    यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे आणि निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर शंकर महादेवन, बेला शेंडे आर्या आंबेकर यांनी चित्रपटातील गाणी सादर केली.
    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed