• Sat. Dec 28th, 2024

    धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 22, 2024
    धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    बारामती, दि. २२: परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले.

    श्री. पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, कऱ्हा नदी सुशोभीकरण, विद्या प्रतिष्ठान येथील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र (एआय सेंटर) तसेच श्रीमंत बाबुजी नाईक वाडा येथे सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे आदी उपस्थित होते.

    श्री. पवार म्हणाले, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कामे करताना इमारतीच्या खोलीत हवा खेळती राहील तसेच पुरेसा सूर्यप्रकाश येईल, यादृष्टीने कामे करावीत. डॉक्टरांना वैद्यकीय उपकरणे ठेवताना अडथळा निर्माण होणार नाही, याप्रमाणे टेबलची रचना करावी. आगामी काळात परिसरात वाहतूक कोंडी टाळण्याच्यादृष्टीने परिसरातील रस्ते रुंद करावेत. रस्त्यावर पाणी साचणार नाही, याबाबतही दक्षता घ्यावी. वीजनिर्मितीकरीता अत्याधुनिक सौरऊर्जा उपकरणे बसवा. परिसरात अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याकरीता आराखडा तयार करा.

    प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे  करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे. खोलीत स्वच्छ सूर्यप्रकाश राहील तसेच नागरिकांना स्पष्ट दिसेल असे विजेचे दिवे परिसरात लावावेत. दिवे लावताना नागरिकांच्या सुरक्षितेतचाही विचार करावा. भिंती, फरश्यामधील फटी राहता कामा नये.  लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक  व्यवस्था करावी.

    कऱ्हा नदीच्या संरक्षक भिंतीचे कामे गतीने करा. दशक्रिया विधी घाट परिसरात स्वच्छता ठेवावी. सार्वजनिक विकासकामे करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. परिसरातील विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्या. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

    यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरसेवक किरण गुजर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed