• Thu. Jan 2nd, 2025

    मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    Dec 20, 2024
    मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

    मुंबई, दि.20 : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या Madhukranti.In/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्यायावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

    राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. सदर अभियानांतर्गत  लघु अभियान 1,2 आणि 3 समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

    मधुक्रांती पोर्टलमुळे मधुमक्षिका पालकांना मिळणार लाभ

    मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी केल्यास विविध लाभ मिळणार आहेत. यात मधुमक्षिकापालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना 1 लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होणार आहे. तसेच विना अडथळा मधुमक्षिका पेटयांचे स्थलांतर करता येणार आहे.

    मधुक्रांती पोर्टलवर नोंदणीसाठी आधार कार्ड, अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-200 kb पर्यंत), मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-100 kbपर्यंत) ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

    या नोंदणीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. स्वमालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या 10 ते 100 फ्रेमसाठी 250 नोंदणी शुल्क, 101 ते 250 फ्रेम साठी 500 रुपये, 251 ते 500 फ्रेम साठी एक हजार, 501 ते 1 हजार फ्रेम साठी दोन हजार, 1001 ते दोन हजार फ्रेम साठी दहा हजार, 2001 ते 5 हजार फ्रेम साठी 25 हजार, 5001 ते दहा हजार फ्रेम साठी एक लाख तर दहा हजारापेक्षा अधिक फ्रेम साठी दोन लाख नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

    नोंदणीबाबत अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली 011-23325265, 23719025, मधुक्रांती पोर्टल- Tech Support-18001025026, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे- (020)29703228 यावर संपर्क करावा. जास्तीत जास्त मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed