Rajendra Yadravkar Displeasure Amongst mahayuti leaders: नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दीपक केसरकर, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांना स्थान मिळालेले नाही. विजय शिवतारेंनंतर राजेंद्र यड्रावकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
राजेंद्र यड्रावकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळी मी माझं राज्यमंत्रिपद सोडून त्यांच्यासोबत गेलो होतो. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांच्यासोबत गेलेल्या मी वगळता विद्यमान मंत्र्यांना सर्वांना मंत्रिपद मिळालं. त्यामुळे किमान यावेळी तर मला मंत्रिपद मिळेल अशी माझी अपेक्षा होती. मात्र मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे माझी निराशा झाली, मी नाराज झालो आहे.
Chhagan Bhujbal : मला राज्यसभा हवी होती, तेव्हा सुनेत्रा ताईंना पाठवलं, मग काय बोलणार? भुजबळांची खदखद; म्हणतात लहान खेळणं आहे का मी?
यड्रावकर पुढे म्हणाले, मला वाटतं मंत्रिपद न देण्यामागे नेत्यांच्या काही अडचणी असाव्यात, किंवा छोट्या मित्र पक्षांना मंत्रिपद देणं गरजेचं वाटलं नसावं, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे नेत्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान महायुतीच्या मंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आता डावलण्यात आलेल्या मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. यावर प्रतिक्रिया देत यड्रावकर म्हणाले, अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा मंत्रिपदं बदलली जातील याबद्दल शंका आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षाबाबत मला माहिती नाही, मात्र मी आशावादी आहे. ज्यांच्यासोबत जातो तिथे प्रामाणिक राहतो ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे मी नाराज असलो तरी पाच वर्षे महायुती सोबतच राहणार, असेही यड्रावरकरांनी नमूद केले.